नाशिक, (प्रतिनिधी) २ सप्टेंबर - वडिलांचे असलेल्या अनैतिक संबंधांबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका २० वर्षीय तरुणाला महिला आणि तिच्या तीन मुलांनी मिळून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना अंबड औद्योगिक वसाहतीतील दत्तनगर भागात घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी महिलेसह तिच्या तीन मुलांविरोधात एमआयडीसी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूर येथील अशोकनगर भागात राहणाऱ्या २० वर्षीय तरुणाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. दत्तनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेसोबत आपल्या वडिलांचे अनैतिक संबंध आहेत आणि त्यामुळे वडील कुटुंबाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत, असा संशय तरुणासह त्याच्या कुटुंबीयांना होता.
याच कारणावरून संतापलेल्या मुलाने १६ ऑगस्ट रोजी थेट संशयित महिलेचे घर गाठले व तिला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, जाब विचारल्याचा राग आल्याने संशयित महिलेने आपल्या तीन मुलांच्या मदतीने तरुणावर हल्ला चढवला. या चौघांनी मिळून तरुणाला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.
हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पीडिताच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित महिला व तिच्या तीन मुलांवर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पठाण करत आहेत.