नाशिक, (प्रतिनिधी) २ सप्टेंबर - शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच, पेठरोड भागात दुकानासमोर लघुशंका करण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात एका तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी करण्यात आले, तर दुसरीकडे एका व्यावसायिक महिलेचा विनयभंग करून तिच्या पती व मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पेठरोड येथील शिवपॅलेस हॉल परिसरात २९ ऑगस्ट रोजी दुपारी घडली.
लोखंडी रॉडने हल्ला
पेशाने इलेक्ट्रिशियन असलेला तक्रारदार तरुण रस्त्याने जात असताना लघुशंका करण्यासाठी एका दुकानाजवळ थांबला होता. यावरून महाजन नावाच्या एका दाढीधारी इसमाने व त्याच्या साथीदाराने त्याला हटकले. वाद वाढल्याने संशयितांनी तरुणाला शिवीगाळ करत त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने सपासप वार केले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
विनयभंग अन् मारहाण
दुसरीकडे, एका व्यावसायिक महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ललित भरसट नावाच्या तरुणाने दुकानासमोर लघूशंका करण्यास विरोध केला असता, त्याने महिलेचा विनयभंग केला. त्यानंतर संशयित तरुणाने आपल्या भावाला आणि मित्राला बोलावून घेतले. या त्रिकुटाने महिलेच्या पतीला आणि मुलाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता हल्लेखोरांनी त्यांचा मोबाईल जमिनीवर पछाडून फोडत नुकसान केले.
पोलीस तपास सुरू:
एकाच घटनेचे दोन वेगवेगळे पैलू समोर आल्याने म्हसरूळ पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून परस्परविरोधी गुन्हे नोंदवले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मरसाळे आणि गोसावी करत आहेत.