मनोहर शिंदे, (नाशिक) २ सप्टेंबर - प्रवाशांच्या सुरक्षिततेसोबतच माणुसकी जपणाऱ्या 'सिटीलिंक'च्या (नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि.) कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या कर्तव्यतत्परतेचा प्रत्यय दिला आहे. त्र्यंबकेश्वर दर्शन करून परतताना परिवारापासून ताटातूट झालेली कल्याण येथील ११ वर्षीय मुलगी जान्हवी सागर कोकणे हिला सिटीलिंक चालक, वाहक आणि प्रशासनाच्या सतर्कतेमुळे सुखरूपपणे तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.
नेमकी घटना काय घडली?
३१ ऑगस्ट २०२६ रोजी कल्याण येथील कोकणे परिवार त्र्यंबकेश्वर दर्शन आटोपून सिटीलिंकच्या बसने (मार्ग क्र. २४५, बस क्र. MH-15 GV-7696) पंचवटीच्या दिशेने प्रवास करत होता. पंचवटी कारंजा येथे बस थांबल्यानंतर घाईगडबडीत परिवार खाली उतरला. मात्र, काही वेळातच आपली ११ वर्षीय मुलगी जान्हवी सोबत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिसरात सर्वत्र शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने हताश झालेल्या पालकांनी तातडीने पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
पोलीस अन् सिटीलिंकची जलद कारवाई
पंचवटी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ सिटीलिंक प्रशासनाशी संपर्क साधला. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून संबंधित बसचे चालक श्री. लोहकरे आणि वाहक सौ. अर्चना आंधळे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. यावेळी जान्हवी बसमध्ये एकटीच बसून रडत असल्याचे वाहकांच्या निदर्शनास आले होते.
चालक-वाहकांनी त्वरित या घटनेची माहिती नाशिक रोड येथील पर्यवेक्षक चंद्रकांत आव्हाड, किरण सानप, वैभव चौधरी, अमित उगले, गणेश जाधव, अनिल भुसावरे आणि राजेंद्र वाणी यांना दिली. त्यानंतर चिमुकल्या जान्हवीला अत्यंत सुरक्षितपणे सिटीलिंकच्या कंट्रोल रूममध्ये आणण्यात आले.
अन् आई-मुलीच्या भेटीने उपस्थितांचे डोळे पाणावले
कंट्रोल रूममध्ये आणल्यानंतर मुलगी घाबरलेली आणि उपाशी असल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी तिला आपुलकीने बिस्किटे व पाणी देऊन तिची काळजी घेतली. काही वेळातच तिचे आई-वडील कंट्रोल रूममध्ये पोहोचले. आपल्या मुलीला सुखरूप पाहताच आईने तिला कडाडून मिठी मारली. हा भावनिक क्षण पाहून तिथे उपस्थित पोलीस, प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचेही डोळे पाणावले.
"मुलगी सुखरूप मिळाल्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही. सिटीलिंक कर्मचारी आणि पंचवटी पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळेच आमची मुलगी आम्हांला परत मिळाली," अशी भावना व्यक्त करत कोकणे परिवाराने सर्व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
सिटीलिंक कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे एका कुटुंबावरील मोठे संकट टळले असून सर्व स्तरातून कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.