येवला-लासलगाव मतदारसंघातील विकासकामांचा आढावा.... नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याच्या पंकज भुजबळ यांच्या सूचना

Share:
Main Image
Last updated: 01-Sep-2026

येवला, (प्रतिनिधी) १ सप्टेंबर - येवला-लासलगाव मतदारसंघातील विविध विकासकामांना गती देण्यासोबतच नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्यासाठी आमदार पंकज भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली येवला नगरपालिका तसेच विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीत मतदारसंघातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, वीज, नागरी सुविधा, शासकीय योजना तसेच विविध विकासकामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रलंबित विकासकामे कोणत्याही परिस्थितीत रखडू नयेत, त्यातील अडचणी तातडीने दूर करून कामांना गती द्यावी, तसेच नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात, अशा स्पष्ट सूचना संबंधित आमदार पंकज भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी नागरिकांच्या विविध समस्या व प्रश्न प्रत्यक्ष जाणून घेत त्यांच्याकडून निवेदने स्वीकारण्यात आली. जनतेच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहून त्यावर सकारात्मक आणि कालबद्ध कार्यवाही करावी, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या अनावश्यक फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

Advertisement

दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून रेशनकार्डपासून वंचित असलेल्या पात्र कुटुंबांना रेशनकार्डचे वितरण करण्यात आले. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन आमदार पंकज भुजबळ यांनी यावेळी केले.

येवला-लासलगाव मतदारसंघाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास हेच प्रमुख ध्येय असून, विकासकामे आणि नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासनासोबत सातत्याने समन्वय ठेवून काम केले जाईल, असा विश्वास आमदार पंकज भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.

या बैठकीस स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी, अधिकारी-कर्मचारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Comments

No comments yet.