मविप्र संस्थेच्या नावाने महाघोटाळा... सरचिटणीसांच्या खोट्या सह्या अन् अपर जिल्हाधिकाऱ्यांचा बनावट आदेश..

Share:
Main Image
Last updated: 01-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १ सप्टेंबर - उत्तर महाराष्ट्रातील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज (मविप्र) संस्थेचे बनावट दस्तऐवज, शिक्के आणि सरचिटणीसांच्या खोट्या सह्यांचा वापर करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात भूषण शेवाळे यांच्यासह नोटरी करणाऱ्यांवर व इतरांवर फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन बाबुराव ठाकरे (वय ६२) यांनी यासंदर्भात अधिकृत फिर्याद दिली आहे.

नेमका प्रकार काय?

फिर्यादीनुसार, संशयित आरोपींनी संगनमत करून मविप्र संस्थेचे बनावट लेटरहेड, खोटे शिक्के आणि ॲड. नितीन ठाकरे यांच्या संमतीशिवाय त्यांचा फोटो लावून खोटी स्वाक्षरी केली. याद्वारे संस्थेचा बनावट सामंजस्य करारनामा (MOU) व नोटरी दस्तऐवज तयार करण्यात आले.

इतकेच नव्हे तर, अपर जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथील 'सिक्युरिटायझेशन केस नं. ५२७/२०२४' चा बनावट निकाल आदेश तयार करून तो खरा असल्याचे भासवण्यात आले. या खोट्या आदेशाच्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे उत्कर्ष मधुकर जाधव, मधुकर मुरलीधर जाधव यांच्यासह इतर लोकांची संस्थेच्या नावे आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

संशयितांची नावे :

१. भूषण गमनराव शेवाळे (रा. गाळा क्र. २, निकुंज अपार्टमेंट, विद्याविकास सर्कलजवळ, गंगापूर रोड, नाशिक)

Advertisement

२. अमोल एन. बिडवे

३. अश्विनी एस. गायकवाड

४. बनावट MOU व नोटरी करून देणारा इसम

५. ए. आय. शेख (नोटरी)

गुन्हा दाखल, पोलिसांचा तपास सुरू

हा सर्व प्रकार २३ डिसेंबर २०२४ रोजी व त्यापूर्वी गंगापूर रोडवरील केटीएचएम कॉलेज आवारातील मविप्र मध्यवर्ती कार्यालयाच्या पत्त्याचा गैरवापर करून घडवून आणण्यात आला होता. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३३६(४) आणि ३३८ अन्वये गुन्हा (गु.र.नं. २२३/२०२६) दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक (सपोनि) पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.