लासलगाव, (प्रतिनिधी) १ सप्टेंबर - लासलगाव व परिसरातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून लासलगाव बस आगाराच्या ताफ्यात पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेसचे आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते विधिवत लोकार्पण करण्यात आले.
लासलगाव हे नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी व कृषी केंद्र असून परिसरातील अनेक गावांमधील नागरिक, विद्यार्थी, महिला, शेतकरी, कामगार तसेच नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणावर एसटी बससेवेचा वापर करतात. त्यामुळे प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन लासलगाव बस आगाराचा ताफा अधिक सक्षम करण्यासाठी नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पाच नवीन बसेसमुळे लासलगाव व परिसरातील ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून विविध मार्गांवरील बससेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
‘राजमाता जिजाऊ’ बसेसच्या माध्यमातून सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाची सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहे. नवीन बसेस उपलब्ध झाल्यामुळे जुन्या बसेसवरील ताण कमी होऊन बसफेऱ्यांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. तसेच प्रवाशांना वेळेवर आणि अधिक नियमित बससेवा उपलब्ध करून देण्यासही यामुळे हातभार लागणार आहे.
यावेळी आमदार पंकज भुजबळ म्हणाले की, ग्रामीण भागाच्या विकासामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे. गावागावातील नागरिकांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, बाजारपेठ आणि विविध शासकीय सेवांशी जोडण्यासाठी एसटीची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे लासलगावसह येवला-लासलगाव मतदारसंघातील नागरिकांना अधिक चांगली वाहतूक सुविधा मिळावी, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास प्राधान्य दिले जात आहे. नवीन बसेसमुळे प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच प्रवाशांची मागणी आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन नवीन मार्ग, बसफेऱ्या व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी येवला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, सहायक पोलिस निरीक्षक सागर कोते, लासलगाव आगार व्यवस्थापक प्रशांत गुंड, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, मंगेश गवळी, भाऊसाहेब बोचरे, सचिन दरेकर, विनोद जोशी, पप्पू सस्कर, अशोक नागरे, पांडुरंग राऊत, बालेश जाधव, संतोष राजोळे, राजेंद्र चाफेकर, लतिफ तांबोळी, राजू जाधव, माधव जगताप, राजेंद्र घोडे, इस्माईल मोमिन, मनोहर बोचरे, राजेंद्र मेमाणे, ज्ञानेश्वर दरेकर, सागर खलसे, सद्दाम शेख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच लासलगाव बस आगाराचे चालक, वाहक व कर्मचारी उपस्थित होते.