अपघातग्रस्त दुचाकीस्वार रुग्णालयात गेले... चोरट्यांनी थेट दुचाकीच पळवून नेली...

Share:
Main Image
Last updated: 01-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १ सप्टेंबर - शहरात सध्या चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, अपघाताची संधी साधून दुचाकी लांबवणे आणि रस्त्याने जाणाऱ्या वृद्ध महिलेचे दागिने हिसकावल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी मुंबईनाका आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Advertisement

अपघातग्रस्त दुचाकीस्वार रुग्णालयात; चोरट्याने पुलावरून गाडी केली गायब

अपघातग्रस्त दुचाकीस्वार उपचारासाठी रुग्णालयात गेल्याची संधी साधत चोरट्याने महामार्गावरील उड्डाणपूलावर पार्क केलेली दुचाकी पळवून नेल्याची घटना घडली.

संदीप उत्तम पाटील (रा. म्हाडा, आडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते २५ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पुजा गाठबांधे यांच्यासह दुचाकीने महामार्गावरील उड्डाणपूलावरून जात होते. मुंबईनाका भागात भरधाव दुचाकी घसरल्याने पाटील व गाठबांधे दोघेही जखमी झाले. अपघातानंतर दोघे तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात गेले.

मात्र, उपचार घेऊन परतल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभी केलेली अपघातग्रस्त दुचाकी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार भोये पुढील तपास करत आहेत.

काठेगल्लीत ७७ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली

काठेगल्लीतील आयटीआय कॉलनी परिसरात संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या एका ७७ वर्षीय वृद्ध महिलेचे सोन्याचे मणीमंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्याने हिसकावून नेले.
कुसूम माधव नागपुरे (वय ७७, रा. नवमंगल हौ. सोसा., काठेगल्ली) यांनी याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि. ३१) सायंकाळच्या सुमारास नागपुरे फेरफटका मारून घराकडे परतत असताना, आयटीआय कॉलनी भागात ॲक्टिव्हावरून आलेल्या भामट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे २० ग्रॅम वजनाची आणि ६० हजार २०० रुपये किमतीची सोन्याची पोत जबरीने हिसकावून पोबारा केला.
याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा (स्नॅचिंग) गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता सदावर्ते या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.