मनोहर शिंदे, (नाशिक) १ सप्टेंबर - नाशिक शहर परिसरात विशेषतः गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसा घरफोड्या करून दहशत माजवणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या गुन्हे शाखा युनिट-३ (अंबड) आणि गंगापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आवळल्या आहेत. पोलिसांनी चार सराईत गुन्हेगारांना सुरत, जळगाव आणि बुलढाणा येथून शिताफीने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून नाशिकमधील २० आणि इतर जिल्ह्यांतील १२ असे तब्बल ३२ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत १७ लाख १५ हजार ३६७ रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व घरफोडीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
महात्मा नगरातील चोरीचा लागला सुगावा
महात्मा नगर येथील सारस्वत बँकेजवळील स्वप्निल अपार्टमेंटमधील सौरभ गोपाल शर्मा आणि विनोद राबिया यांच्या बंद घरांचे लॅच लॉक तोडून चोरट्यांनी १३ लाख ८६ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास केली होती. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गंगापूर हद्दीत मागील दीड वर्षांपासून दिवसा घरफोड्यांचे सत्र सुरू असल्याने गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी समांतर तपास सुरू केला.
१० दिवस पाळत ठेवून सुरत-जळगावातून आवळल्या मुसक्या
आरोपींची गुन्हे करण्याची पद्धत (MOB), तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला. आरोपी वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने त्यांना पकडणे आव्हानात्मक होते. पोलीस पथकाने तब्बल १० दिवस सुरत (गुजरात) व जळगाव येथे तळ ठोकून, सोशल मीडिया ॲक्टिव्हिटी आणि हालचालींवर बारीक लक्ष ठेवून चारही आरोपींना बेड्या ठोकल्या.
अटक आरोपींची नावे :
१) चंद्रकांत उर्फ बाबा राजेंद्र पाटील (वय २२, रा. कारेली, ता. पलसाना, जि. सुरत, गुजरात)
२) मिलिंद संजय खैरनार (वय ३२, रा. झोलवा गाव, ता. पलसाना, जि. सुरत, गुजरात)
३) बाळकृष्ण गोपी उर्फ जितू गोकुळ जाधव (वय ३१, रा. झोलवा गाव, ता. पलसाना, जि. सुरत, गुजरात)
४) सौरभ प्रकाश महाजन (वय २८, रा. लिहा बुद्रुक, ता. मोताळा, जि. बुलढाणा)
जप्त केलेला मुद्देमाल :
१३० ग्रॅम सोने (किंमत ₹१३,५६,९९३)
३ किलो २३२ ग्रॅम चांदी (किंमत ₹३,४५,२१७)
वाहनांच्या २६ बनावट (डुप्लिकेट) नंबर प्लेट्स (किंमत ₹१२,६५०)
घरफोडीसाठी लागणारे कटर, लोखंडी पाईप, कटवणी व स्क्रू ड्रायव्हर (किंमत ₹१,५००)
(एकूण जप्त मुद्देमाल : ₹१७,१५,३६७)
राज्यासह परराज्यांत ७२ हून अधिक गुन्हे दाखल
या टोळीवर यापूर्वी जळगाव, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अकोला तसेच गुजरातमधील भावनगर येथे घरफोडीचे ७२ हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्राथमिक चौकशीत नाशिक शहरातील गंगापूर पोलीस ठाण्यातील २० गुन्हे, छत्रपती संभाजीनगरमधील ६ गुन्हे आणि अमरावती शहर आयुक्तालय परिसरातील २६ गुन्ह्यांमध्ये या टोळीचा थेट सहभाग असल्याचे समोर आले आहे.
सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून टोळीतील आणखी दोन साथीदार फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असून तपासात आणखी काही मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-१) मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, सहायक पोलीस आयुक्त प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, जग्वेंद्रसिंग राजपूत, पोलीस निरीक्षक जमीर शेख, सपोनि तुषार देवरे, पोउपनि मोतीलाल पाटील व त्यांच्या पथकाने केली.