भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू... डीजीपी नगर-वडाळा मार्गावरील दुर्घटना...

Share:
Main Image
Last updated: 01-Sep-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १ सप्टेंबर - डीजीपी नगर ते वडाळा मार्गावर गणपती मंदिरासमोर झालेल्या भीषण अपघातात ३५ वर्षीय दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. मागून भरधाव आलेल्या एका अज्ञात मालट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

आदित्य प्रकाश दुसाने (वय ३५, रा. श्री प्रगती सोसायटी, इंदिरानगर, नाशिक) असे अपघातात प्राण गमावलेल्या तरुणाचे नाव आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य दुसाने हे सोमवारी (दि. ३१) सायंकाळच्या सुमारास टाकळी परिसर येथून आपल्या दुचाकीने इंदिरानगर येथील घराकडे परतत होते. डीजीपी नगर १ ते वडाळा मार्गावरील गणपती मंदिरासमोर आले असता, मागून प्रचंड वेगात आलेल्या एका अज्ञात मालट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, अपघातानंतर ट्रकचे चाक आदित्य यांच्या अंगावरून गेले.

या घटनेत आदित्य दुसाने हे गंभीर जखमी झाले. अपघात घडल्याचे समजताच त्यांचे भाऊ वैभव दुसाने यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच डॉ. अखिलेश सोमवाणी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात ट्रकचालकाचा पोलीस शोध घेत असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोरपड करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.