नाशिक, (प्रतिनिधी) ३१ ऑगस्ट - शासनाकडून मंजूर झालेल्या वैद्यकीय खर्चाच्या बिलाची रक्कम बँक खात्यात जमा करण्यासाठी तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सातपूर येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाच्या वरिष्ठ सहाय्यकास नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने आरोपीस १ वर्षाचा कारावास आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
रामचंद्र नरसु माकरे (वरिष्ठ सहाय्यक, वर्ग-३, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सातपूर, नाशिक) असे शिक्षा झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
काय होते प्रकरण?
तक्रारदाराचे वैद्यकीय खर्चाचे बिल शासनाकडून मंजूर झाले होते. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात वरिष्ठ सहाय्यक रामचंद्र माकरे याने १६ सप्टेंबर २०१४ रोजी शासकीय पंचांसमक्ष ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती २ हजार रुपये लाच घेण्याचे ठरले. त्याच दिवशी राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील वैद्यकीय खर्च प्रतिकृती कक्षासमोरील हॉलमध्ये तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने माकरे याला रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासाअंती न्यायालयात आरोपपत्र
सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ९ एप्रिल २०१५ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश अमित विनायक खारकर यांच्यासमोर झाली. सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य धरून न्यायालयाने रामचंद्र माकरे याला दोषी ठरवले.
न्यायालयाने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये ६ महिने कारावास व १ हजार रुपये दंड (दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास) आणि कलम १३ (२) अन्वये १ वर्षाचा कारावास अशी शिक्षा सुनावली.
यांनी पाहिले कामकाज
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (नाशिक परिक्षेत्र) पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व अपर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी आणि कोर्ट पैरवी अंमलदार पोलीस हवालदार प्रदीप काळोगे यांनी कामकाजात सहकार्य केले. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता शिरीष कडवे व सचिन गोरवाडकर यांनी युक्तिवाद केला.
लाच मागितल्यास '१०६४' वर संपर्क साधा
कोणत्याही शासकीय कामासाठी अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी निर्भिडपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ९५४५६५१०६४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन 'लाचलुचपत'तर्फे करण्यात आले आहे.