नाशिक, (प्रतिनिधी) ३१ ऑगस्ट - शेजारी बसलेल्या भामट्या महिलांनी चालत्या रिक्षामध्ये अत्यंत शिताफीने पर्स कापून वृद्ध महिला प्रवाशाची ४० हजार रुपयांची रोख रक्कम लांबविल्याची घटना घडली आहे. हा प्रकार मुंबई-आग्रा महामार्गावरील जत्रा हॉटेल ते नांदूरगाव दरम्यान घडला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात महिला चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुष्पा मगन बैसाणे (वय ६६, रा. भक्तीनगर, देवपूर, जि. धुळे) असे फसवणूक झालेल्या महिला प्रवाशाचे नाव असून त्यांनी याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे येथील रहिवासी असलेले बैसाणे दाम्पत्य रविवारी (दि. ३०) नाशिकमधील नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. रविवारी प्रवासादरम्यान महामार्गावरील जत्रा हॉटेल येथून नांदूरगावात जाण्यासाठी त्यांनी 'एमएच १५ जेए ९२२७' या क्रमांकाच्या रिक्षात प्रवास सुरू केला.
या रिक्षात बैसाणे दाम्पत्यासह अन्य तीन महिला सहप्रवासी म्हणून बसलेल्या होत्या. प्रवासादरम्यान या अज्ञात भामट्या महिलांनी पुष्पा बैसाणे यांचे लक्ष नसताना धारदार वस्तूच्या साहाय्याने त्यांच्या हातातील पर्स कापली. त्यानंतर पर्समध्ये असलेली ४० हजार रुपयांची रोकड अत्यंत शिताफीने लांबवून त्या पसार झाल्या.
नांदूरगाव येथे पोहोचल्यानंतर पर्स कापल्याचे आणि रोकड चोरीला गेल्याचे बैसाणे यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने आडगाव पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार देसाई पुढील तपास करत आहेत.
सावधानता बाळगा :
सार्वजनिक वाहने किंवा रिक्षातून प्रवास करताना सहप्रवाशांपासून सावध राहावे. हातातील पर्स किंवा मौल्यवान वस्तू स्वतःच्या सुरक्षेत ठेवाव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.