नाशिक, (प्रतिनिधी) ३१ ऑगस्ट - भरधाव वेगात आलेल्या एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरूणासह तरूणी गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावरील जुना जकात नाका (आडगाव टी-पॉईंट) परिसरात घडला. या धडकेत दुचाकीचेही मोठे नुकसान झाले असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साक्षी गणेश शिरसाठ (रा. म्हाडा कॉलनी, आडगाव) आणि विक्की रविंद्र जगताप (रा. इगतपुरी) अशी या अपघातात जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी जखमी तरूणी साक्षी शिरसाठ हिने आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २७) दुपारच्या सुमारास साक्षी शिरसाठ ही तिचा मित्र विक्की जगताप याच्या 'एमएच १५ केडी ९५२०' या दुचाकीवरून म्हाडा कॉलनीकडून आडगावच्या दिशेने जात होती. दोघे मित्र जुना जकात नाका भागातील आडगाव टी-पॉईंट येथे पोहोचले असता, ओझरकडून भरधाव वेगात आलेल्या 'एमएच १४ एमएच १९५७' या एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीवरून खाली फेकला गेल्याने साक्षी आणि विक्की दोघेही जखमी झाले, तसेच त्यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना तात्काळ उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी आडगाव पोलिसांत बसचालकाविरुद्ध अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार देवरे पुढील तपास करत आहेत.