नाशिक, (प्रतिनिधी) ३१ ऑगस्ट - धारदार चाकूचा धाक दाखवून एका २५ वर्षीय सराईत गुन्हेगाराने १४ वर्षीय अल्पवयीन मुलाशी समलैंगिक चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार सातपूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे आणि 'पोक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर तुकाराम शिंगाडे (वय २५, रा. संतोषी माता मंदिराजवळ, सातपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १४ वर्षीय मुलगा शनिवारी (दि. २९) रात्रीच्या सुमारास आपल्या घराजवळ मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. त्यावेळी संशयित सागर शिंगाडे याने मुलाला जवळ बोलावून घेतले. त्यानंतर गळ्यात हात टाकून त्याला काही अंतरावर नेले. तेथे चाकूचा धाक दाखवत 'तू मला खूप आवडतो' असे म्हणून त्याच्याशी समलैंगिक चाळे केले. पीडित मुलाने प्रसंगावधान राखून संशयिताच्या तावडीतून कशीबशी सुटका केली आणि तेथून पळ काढला.
मात्र, दुसऱ्या दिवशीही संशयिताने पुन्हा मुलाच्या घराजवळ येऊन त्याला भेटण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या त्रासाला कंटाळून आणि भीतीच्या सा सावटाखाली असलेल्या मुलाने घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी तातडीने सातपूर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक बुवा या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.