केशव खेडकर, (नाशिक) ३१ ऑगस्ट - नाशिक हे केवळ कृषी आणि धार्मिक पर्यटनाचे केंद्र राहिले नसून आता ते देशातील प्रमुख 'कॉर्पोरेट आणि टेक हब' म्हणून वेगाने पुढे येत आहे. याचा प्रत्यय सध्या शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. नाशिकस्थित बहुराष्ट्रीय क्लाउड आणि डेटा सेंटर कंपनी 'ESDS सॉफ्टवेअर सोल्यूशन्स' (ESDS Software Solution) च्या ७२० कोटींच्या भव्य आयपीओने बाजारात जोरदार हवा निर्माण केली असतानाच, आता नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील 'फायकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेड' (Phychem Technologies Ltd.) चा १४.५८ कोटींचा आयपीओ (SME IPO) बाजारात दाखल झाला आहे.
एकाच वेळी नाशिकच्या आयटी आणि मॅन्यूफॅक्चरिंग क्षेत्रातील दोन प्रमुख कंपन्यांचे आयपीओ बाजारात आल्याने भारतीय भांडवली बाजारात नाशिकच्या उद्योगांचा दबदबा वाढला आहे.
१. सातपूरची ओळख 'ESDS': क्लाउड आणि डेटा सेंटर क्षेत्रातील दिग्गज
नाशिकच्या सातपूर एमआयडीसीत (MIDC Satpur) मुख्यालय असलेल्या पीयूष सोमाणी यांच्या ESDS सॉफ्टवेअर सोल्यूशन्स या कंपनीचा ७२० कोटी रुपयांचा आयपीओ सध्या खुला आहे.
किंमत (Price Band): ₹४०८ ते ₹४२९ प्रति शेअर.
हेतू: उभारलेल्या निधीतील ५७६ कोटी रुपये डेटा सेंटर विस्तार आणि क्लाउड कॉम्प्युटिंग उपकरणांच्या खरेदीसाठी वापरले जाणार आहेत.
वैशिष्ट्य: देशात क्लाउड, डेटा सेंटर आणि एआय (AI) तंत्रज्ञानात स्वावलंबी असलेली ही नाशिकची ओळख आता देशातील प्रमुख शेअर बाजारांमध्ये (BSE/NSE) सूचीबद्ध (List) होणार आहे. ESDS ने आधीच अँकर गुंतवणूकदारांकडून २१६ कोटी रुपयांचा निधी उभारला आहे.
२. दिंडोरीची 'फायकेम टेक्नॉलॉजीज': प्लास्टिक व पॉलिमर क्षेत्रातील उदयोन्मुख तारा
ESDS च्या पाठोपाठ दिंडोरी तालुक्यातील खतवड येथील प्लांट असलेल्या फायकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेड चा आयपीओ बीएसई एसएमई (BSE SME) वर सादर झाला आहे.
आयपीओ आकार (Issue Size): १४.५८ कोटी रुपये (२७ लाख फ्रेश शेअर्स).
प्राईस बँड: ₹५१ ते ₹५४ प्रति शेअर.
लॉट साईझ: ४,००० शेअर्स (किमान गुंतवणूक ₹२,१६,०००).
अँकर बुकिंग: मुख्य इश्यू खुल्या होण्यापूर्वीच कंपनीने संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ४.११ कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे.
व्यवसाय: उमाकांत सावडेकर व उल्का सावडेकर यांच्या नेतृत्वाखालील ही कंपनी रोटेशनल मोल्डिंग (Roto Molding) कंपाऊंड्स, LLDPE आणि स्पेशालिटी एडिटिव्ह पावडर बनवण्यात अग्रेसर आहे, ज्याचा वापर टाक्या आणि ऑटोमोबाईल पार्ट निर्मितीत होतो.
नाशिकच्या अर्थकारणाला नवी दिशा
नाशिकमधील एका बाजूला उच्च तंत्रज्ञान पुरवणारी आयटी क्षेत्रातील कंपनी आणि दुसऱ्या बाजूला दिंडोरीसारख्या भागात प्रक्रिया उद्योग उभारणारी उत्पादन क्षेत्रातील कंपनी – या दोन्ही कंपन्यांचा एकापाठोपाठ आयपीओ येणे ही नाशिककरांसाठी आणि येथील औद्योगिक जगतासाठी अभिमानास्पद बाब आहे.
यामुळे नाशिकच्या स्थानिक कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास वाढण्यासोबतच जिल्ह्यातील रोजगार निर्मिती आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.