विकास नाशिककर, (नाशिक) २९ ऑगस्ट - जागतिक पातळीवरील प्रमुख बँक असलेल्या 'एचएसबीसी इंडिया'ने (HSBC India) नाशिक शहरात आपली नवीन शाखा सुरू केली आहे. देशभरात वेल्थ बँकिंग आणि प्रीमियर बँकिंग सेवांचा विस्तार करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून ही शाखा सुरू करण्यात आली असून, यामुळे नाशिकमधील उद्योजक, श्रीमंत व्यावसायिक (HNWIs) आणि अनिवासी भारतीय (NRI) ग्राहकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहेत.
नाशिक: गुंतवणुकीचे नवे केंद्र
नाशिक हे केवळ कृषी किंवा अन्नप्रक्रियेपुरते मर्यादित न राहता अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, लॉजिस्टिक्स आणि टेक्स्टाईल अशा विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र बनत आहे. नाशिकमध्ये सध्या १४,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे ३१४ प्रकल्प प्रस्तावित असून, त्यातून ३५,००० हून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. या वाढत्या आर्थिक प्रगतीला आणि श्रीमंत ग्राहकवर्गाच्या आर्थिक गरजांना पाठबळ देण्यासाठी ही नवीन शाखा मोलाची ठरणार आहे.
मेट्रो शहरांबाहेर संपत्ती निर्मितीचे नवे टप्पे
नाशिकमधील ही नवीन शाखा थत्ते नगर, केबीटी सर्कल जवळ, स्टारबक्स शेजारी सुरू करण्यात आली आहे. शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना एचएसबीसी इंडियाचे इंटरनॅशनल वेल्थ अँड प्रीमियर बँकिंग प्रमुख संदीप बत्रा म्हणाले, "भारतात आता केवळ मेट्रो शहरांतच नव्हे, तर नाशिकसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर संपत्ती निर्माण होत आहे. येथील उद्योजकता आणि वाढती आर्थिक महत्वाकांक्षा लक्षात घेता ग्राहकांना जागतिक दर्जाच्या बँकिंग व वेल्थ मॅनेजमेंट सेवा त्यांच्या जवळ उपलब्ध करून देणे हा आमचा उद्देश आहे."
आरबीआयच्या मंजुरीनंतर विस्तार मोहीम
रिझर्व्ह बँकेने (RBI) एचएसबीसीला देशात २० नवीन शाखा उघडण्याची परवानगी दिली आहे. त्याअंतर्गत नाशिक, नागपूर, सुरत, इंदूर, वडोदरा, लखनऊ यांसारख्या शहरांनंतर आता नवीन शाखा सुरू करण्यात आली आहे. सध्या एचएसबीसी इंडियाच्या २२ शहरांमध्ये एकूण ३४ शाखा कार्यरत आहेत.