नाशिक, (प्रतिनिधी) २९ ऑगस्ट - सिंहस्थ कुंभमेळा कामांमुळे वाहतुकीत झालेल्या बदलांचा आणि निमाणी बसस्थानकातील प्रचंड गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी आपला मोर्चा प्रवाशांकडे वळवला आहे. शुक्रवारी (दि. २८) रक्षाबंधनानिमित्त माहेरी जाण्यासाठी निघालेल्या तीन प्रवासी महिलांना चोरट्यांनी लक्ष्य करत तब्बल ४ लाख ८० हजार रुपये (पावणेपाच लाख) किमतीचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सिंहस्थ कुंभमेळा कामांमुळे सीबीएस, मेळा आणि महामार्ग स्थानकांवरून सुटणाऱ्या बसेस सध्या निमाणी बसस्थानकातून सोडल्या जात आहेत. यामुळे या परिसरात दिवसभर जत्रेचे स्वरूप आले असून वाहतूक कोंडी आणि गर्दीमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. याच गर्दीची संधी साधून भामटे राजरोसपणे प्रवाशांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि मौल्यवान साहित्य लांबवत आहेत.
नजर चुकवून पर्स लांबवली
पहिली घटना शुक्रवारी दुपारी फलाट क्रमांक ३ वर घडली. चांदवड येथील रहिवासी कमल शामराव पगार या बसची वाट पाहत बसलेल्या असताना अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून पर्स चोरून नेली. या पर्समध्ये २० हजार रुपयांच्या रोकडीसह ४ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे अलंकार होते.
बसमध्ये चढताना मंगळसूत्र पळवले
इतर दोन घटना सकाळी बसमध्ये चढताना घडल्या. जुईनगर (म्हसरूळ) येथील सोनी सुनील गांगुर्डे या पिंपळनेर-साक्री बसमध्ये चढत असताना, तर पूजा दिगंबर पवार या दुसऱ्या एका बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हातोहात लांबवले. दोन्ही घटनांमध्ये प्रत्येकी ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेले आहे.
या तिन्ही घटनांप्रकरणी पीडित महिलांच्या तक्रारींवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस हवालदार नवनाथ रोकडे या प्रकरणांचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, बसस्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.