नाशिक, (प्रतिनिधी) २९ ऑगस्ट - आंघोळीला लवकर जाण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून सहा न्यायालयीन कैद्यांनी एका कारागृह अंमलदारास (शिपाई) बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात घडली. "पुन्हा या वर्तुळात (सर्कल) ड्युटी घेतली तर तुझ्याकडे बघून घेऊ," अशी धमकीही संशयितांनी दिली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सहा कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम शहाराम लोखंडे, रोहित उर्फ बबलू बाबासाहेब गोलेकर, अविनाश नानाजी उशीरे, अनिल विष्णू रेडेकर, सागर मधुकर गरड आणि अनिकेत विजय सोमवंशी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित न्यायालयीन कैद्यांची नावे आहेत. याबाबत कारागृह शिपाई नितीन अंबादास हेमके (रा. जेलरोड) यांनी तक्रार दिली आहे.
अशी घडली घटना
बुधवारी (दि. २७) सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास कारागृह अधीक्षक यांची यार्ड क्रमांक पाच ते आठ येथे संचारफेरी सुरू होती. त्या वेळी अंमलदार हेमके तेथे ड्युटीवर तैनात असून परिसराच्या स्वच्छतेचे काम सुरू होते. स्वच्छता मोहिमेदरम्यान हेमके यांनी तेथील न्यायालयीन कैद्यांना आंघोळ व तत्सम कामे लवकर उरकण्यास सांगितले.
खाली पाडून मारहाण
आंघोळीला लवकर जाण्यास सांगितल्याचा राग आल्याने संशयित कैद्यांनी हेमके यांच्याशी वाद घालत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. संशयित शुभम लोखंडे याने रागाच्या भरात अन्य कैद्यांच्या मदतीने हेमके यांना खाली पाडून मारहाण केली. तसेच, या सर्कलमध्ये पुन्हा ड्युटी केल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर अंमलदार हेमके यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी सहाही संशयित कैद्यांविरोधात गुन्हा नोंदवला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.