नाशिक, (प्रतिनिधी) २९ ऑगस्ट - वडनेर-पाथर्डी मार्ग परिसरात चोरट्यांनी मध्यरात्री धुमाकूळ घालत तीन दुकानांचे (गाळे) शटर उचकटून सुमारे दोन लाख रुपये किमतीचा ऐवज लांबवला. यात वेल्डिंग वर्कशॉपमधील महागडे साहित्य, पाण्याच्या मोटारी, कॉपर वायर बंडल आणि औषध फवारणी पंपांचा समावेश आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा एकत्रित गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रविण हरि देवकर (रा. वडाळा पाथर्डी रोड) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. देवकर यांचे बरड मळा परिसरात वेल्डिंग वर्कशॉप आहे. गुरुवारी (दि. २७) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून वर्कशॉपमध्ये प्रवेश केला. गाळ्यातून जनरेटर, वेल्डिंग मशिन, ग्राइंडर, ड्रिल मशिन आणि कॉपर वायर असा सुमारे ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पळवला.
इतर दोन ठिकाणीही घरफोडी
दुसरी घटना तुळजा भवानी पेट्रोल पंप भागात घडली. येथे विनायक काळू घुगे (रा. पांडवनगरी, इंदिरानगर) यांचा गाळा फोडून चोरट्यांनी चार पाण्याच्या मोटारी, वायर बंडल, कॉपर, औषध फवारणीचे दोन पंप व इतर साहित्य असा ७० हजारांचा ऐवज लांबवला.
तिसरा प्रकार एकता नगर भागात घडला असून, शुभम मोहन शेळके (रा. भगूर) यांचे दुकान फोडून पाण्याच्या दोन छोट्या मोटारी, कॉपर वायर आणि अन्य साहित्य असा सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तिन्ही घटनांचा मिळून सुमारे २ लाखांचा माल चोरीला गेला असून पोलीस हवालदार पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
घरफोडीत हात काही न लागल्याने
घरफोडीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोरट्यांच्या हाती मौल्यवान ऐवज न लागल्यामुळे त्यांनी थेट हॉलमध्ये उभी केलेली दुचाकीच पळवून नेल्याची घटना बार्न्स स्कूल रोड भागात घडली.
याबाबत अमिता सचिन वाघचौरे यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. चोरट्यांनी घरातील 'एमएच १५ एचजे ८६५७' या क्रमांकाची दुचाकी पळवून नेली असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.