नीट परीक्षेसाठी नियम आणखी कठोर... यावर पूर्णपणे बंदी...

Share:
Main Image
Last updated: 29-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २९ ऑगस्ट - राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) द्वारे ३० ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या 'नीट (युजी) २०२६' परीक्षेच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी कडक सुरक्षेचे पाऊल उचलले आहे. परीक्षा अत्यंत पारदर्शक, शांततेत आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी परीक्षा केंद्रांच्या चारही दिशांनी १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत निर्बंध

परीक्षेच्या दिवशी म्हणजेच ३० ऑगस्ट रोजी सकाळी ६.०० वाजेपासून ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत परीक्षा केंद्र परिसरात अनधिकृत व्यक्ती आणि वाहनांना प्रवेश मनाई करण्यात आली आहे. परीक्षार्थींना कॉपी किंवा इतर अनुचित साहित्य पुरविण्याच्या शक्यता पूर्णपणे मोडून काढण्यासाठी, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.

यांना आदेशातून सूट:

अधिकृत परीक्षार्थी आणि परीक्षा पर्यवेक्षक.

केंद्रावरील नियुक्त अधिकारी व कर्मचारी.

Advertisement

बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार.

झेरॉक्स सेंटर आणि सायबर कॅफे राहणार बंद

परीक्षा केंद्र परिसरातील १०० मीटरच्या अंतरात असलेले सर्व झेरॉक्स सेंटर, सायबर कॅफे, टेलिफोन बूथ आणि फॅक्स दुकाने बंद ठेवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर पूर्ण बंदी

परीक्षा केंद्र परिसरात मोबाईल फोन, डिजिटल डायरी, कॉर्डलेस फोन, पेजर, कॅल्क्युलेटर, मायक्रोफोन, वायरलेस सेट, इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच कोणत्याही प्रकारची आग्नेयास्त्रे व घातक शस्त्रे बाळगण्यास अथवा वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

नियम मोडल्यास कडक कारवाई

सदर प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम २२३ अन्वये कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.