पुण्यात 'सिप्ला फार्मा'ला एफडीए चा जोरदार दणका... पुण्यात केली ही कठोर कारवाई...

Share:
Main Image
Last updated: 29-Aug-2026

पुणे, (प्रतिनिधी) २९ ऑगस्ट - अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) महाराष्ट्र राज्यात औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि कायदेशीर वितरण सुनिश्चित करण्यासाठी धडक कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे. या मोहिमेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील वडकी येथील 'सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्स लिमिटेड' या नामांकित कंपनीच्या 'कॅरी अँड फॉरवर्डिंग' (CFA) औषध विक्री परवान्यावर एफडीएने मोठी कारवाई करत, २७ ऑगस्ट २०२६ पासून त्यांचे परवाने तात्काळ प्रभावाने रद्द केले आहेत.

काय आहे प्रकरण?

जून २०२६ मध्ये अन्न व औषध प्रशासनाने वडकी येथील सिप्लाच्या मुख्य गोदामावर छापा टाकला होता. या तपासणीदरम्यान 'रेक्टिन प्लस टॅबलेट' (Reactin Plus Tablets) या 'शेड्यूल एच' (Schedule H) प्रवर्गातील औषधाच्या पॅकेजिंगवर अनालजेसिक व अँटीपायरेटीक असा बेकायदेशीर आणि परवानगी नसलेला जाहिरातवजा मजकूर छापल्याचे उघडकीस आले. औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम १९४० आणि नियम १९४५ मधील तरतुदींचा हा थेट भंग असल्याने एफडीएने तत्काळ कारवाई करत तब्बल ११.१९ लाख रुपये किमतीचा औषधसाठा जप्त केला होता.

'सेल्फ-मेडिकेशन' आणि सार्वजनिक आरोग्याला धोका

अशा प्रकारच्या अनधिकृत जाहिरातींमुळे नागरिकांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेण्याची (Self-Medication) घातक सवय वाढू शकते, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्यास मोठा धोका निर्माण होतो. या कारणास्तव प्रशासनाने या 'मिसब्रँडेड' औषधाचा संपूर्ण साठा बाजारातून तत्काळ मागे घेण्याचे (Recall) आदेश दिले होते. मात्र, कंपनीने या निर्देशांचे योग्य ते पालन केले नाही.

तपासणीत उघडकीस आलेल्या ७ गंभीर त्रुटी:

कंपनीच्या सीएफए (CFA) विक्री आणि वितरण व्यवस्थेची सखोल पडताळणी केली असता खालील गंभीर गैरप्रकार समोर आले:

१. औषधांच्या साठवणुकीत (Storage Conditions) मोठ्या प्रमाणात त्रुटी.

Advertisement

२. प्रत्यक्ष औषध साठा आणि संगणकीकृत अभिलेख (Records) यांमध्ये तफावत.

३. 'ड्रग रिकॉल' (औधध मागे घेणे) संदर्भातील निर्देशांचे उल्लंघन.

४. खरेदी-विक्री नोंदींमध्ये विसंगती.

५. औषधांचा साठा थेट जमिनीवर ठेवल्याचे आढळले.

६. साठवणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या 'पॅलेट्स' (Pallet/Park) ची अपुरी व्यवस्था.

७. मुदतबाह्य (Expired) औषधांच्या व्यवस्थापनात आणि त्याच्या नोंदी ठेवण्यात निष्काळजीपणा.

परवाना तात्काळ प्रभावाने रद्द

या गंभीर त्रुटी आढळल्यानंतर एफडीएने कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, सिप्लाने दिलेले स्पष्टीकरण अस समाधानकारक ठरले. नियमांचे पालन करण्यात अपयशी ठरल्याने औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियमानुसार प्रशासनाने सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्स लिमिटेड, वडकी यांचे औषध विक्री परवाने २७ ऑगस्ट २०२६ पासून तात्काळ प्रभावाने रद्द केले आहेत.

एफडीएच्या या धडक कारवाईमुळे औषध निर्मिती आणि वितरण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इतर कंपन्यांनाही या कारवाईतून कठोर इशारा मिळाला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.