नाशिक, (प्रतिनिधी) २९ ऑगस्ट - नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित ‘कुंभ भक्ती संगम’ या तीन दिवसीय सोहळ्याच्या पहिल्या दिवसाची संस्मरणीय सांगता सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या ‘अभंगवारी’ने झाली. येथील ठक्कर डोम परिसरामध्ये पार पडलेल्या या विशेष संगीत कार्यक्रमात अभंगांच्या भावपूर्ण सादरीकरणाने उपस्थित हजारो रसिकांना भक्तीरसात न्हाऊन निघण्याची अनुभूती दिली.
‘गजर’ ते ‘कानडा राजा’चा सुरेल प्रवास
मैफलीची सुरुवात विठ्ठल नामाच्या 'गजर'ने झाली. यानंतर ‘राजस सुकुमार’, ‘भाग्यदा’, ‘आनंदाच्या कोटी’ आणि ‘खेळ मांडियेला’ यांसारख्या एकापेक्षा एक सरस रचनांनी संपूर्ण वातावरण भक्तीमय करून सोडले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सादर झालेल्या ‘काळ देहासी’, ‘अबीर गुलाल’, ‘तीर्थ विठ्ठल’ आणि ‘माझे माहेर’ या अभंगांनी श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेतला. अखेर ‘कानडा राजा पंढरीचा’ या लोकप्रिय अभंगाने मैफलीची सांगता झाली, ज्याला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली.
गुणी कलाकारांची लाभली सुरेल साथ
या 'अभंगवारी'मध्ये राहुल देशपांडे यांच्या मुख्य गायनाला सहगायिका दीप्ती माटे यांनी तितकीच तोडीस तोड साथ दिली. तर संपूर्ण कार्यक्रमाचे लालित्यपूर्ण सूत्रसंचालन व निवेदन विघ्नेश जोशी यांनी केले.
वाद्यवृंद आणि तांत्रिक साथ:
वाद्यवृंद: निखिल फाटक (तबला), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), विशाल धुमाळ (की-बोर्ड), निनाद मुळाओकर (बासरी), रोहन वणगे (तालवाद्य), प्रसाद जोशी (पखावज) आणि राहुल देव (बास गिटार).
कोरस: ऋषिकेश पाटील, निमिष उत्पात आणि राजस जोशी.
ध्वनिव्यवस्था: परीक्षित कुलकर्णी.
पारंपरिक अभंगांना आधुनिक व शास्त्रीय संगीताच्या विविध रंगांची जोड देत सादर केलेल्या या मैफलीने नाशिककरांना एक अविस्मरणीय अनुभव दिला.
पहिल्या दिवसाचा अभूतपूर्व प्रतिसाद
प. पू. अमृताश्रम स्वामी महाराज यांच्या ओघवत्या कीर्तनाने ‘कुंभ भक्ती संगम’च्या पहिल्या दिवसाचा शुभारंभ झाला होता. दिवसभरातील विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनंतर राहुल देशपांडे यांच्या ‘अभंगवारी’ने या सोहळ्याच्या पहिल्या दिवसाची सांगता भक्ती, संगीत आणि संस्कृतीच्या अनोख्या संगमाने झाली.