‘मतदार पुनरीक्षणा’च्या लिंकवर क्लिक पडले महागात... बँक खात्यातून साडेसहा लाख लंपास...

Share:
Main Image
Last updated: 28-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २८ ऑगस्ट - भारतीय निवडणूक आयोगाच्या नावाने पाठवलेल्या एका बनावट लिंकद्वारे सायबर भामट्यांनी निवृत्त ज्येष्ठ नागरिकाची तब्बल साडेसहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मतदार पुनरीक्षणाच्या नावाखाली आलेल्या लिंकवर क्लिक करताच बँक खात्यातील रक्कम परस्पर लांबवण्यात आली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरुणकुमार रामेश्वरप्रसाद जैसवाल (वय ८०, रा. अश्विननगर, सिडको) असे फसवणूक झालेल्या निवृत्त ज्येष्ठाचे नाव असून त्यांनी पोलिसांत अधिकृत फिर्याद दिली आहे.

अशी झाली फसवणूक

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैसवाल हे सोमवारी (दि. २४) दुपारी घरात मोबाईल हाताळत असताना त्यांच्या व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला. त्यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाचा हवाला देत ‘मतदार यादी सखोल पुनरीक्षण’ (Voter Revision) संदर्भात माहिती अपडेट करण्याचे भासवण्यात आले होते.

सरकारी कामाशी संबंधित अधिकृत मेसेज समजून जैसवाल यांनी त्या मेसेजमधील लिंकवर क्लिक केले. लिंक उघडताच सायबर भामट्यांनी त्यांच्या मोबाईलचा ताबा मिळवून त्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारला. जैसवाल यांच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने तब्बल ६ लाख ५६ हजार १४ रुपयांची रक्कम अज्ञात खात्यांवर परस्पर वर्ग करण्यात आली. बँक खात्यातून पैसे कपात झाल्याचे समजताच त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली.

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये (IT Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक बागुल पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.