नाशिक, (प्रतिनिधी) २८ ऑगस्ट - मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्यव्यापी शिपाई पद भरती परीक्षेत एका परीक्षार्थ्याने चक्क मोबाईलचा वापर करून पेपर सोडवल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. परीक्षा पर्यवेक्षकांच्या सतर्कतेमुळे हा गैरप्रकार उघडकीस आला असून, संशयिताचा मोबाईल जप्त करत त्याच्याविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज निवृत्ती वाघ (बैठक क्रमांक १५१६२१) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित परीक्षार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी नाशिकरोड येथील सहदिवाणी न्यायालयाचे सहायक अधीक्षक तुषार वडघुले यांनी गंगापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पर्यवेक्षकांच्या सतर्कतेने भांडाफोड
मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने बुधवारी (दि. २६) संपूर्ण राज्यात शिपाई पदासाठी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. नाशिकमधील विविध केंद्रांसह गंगापूर रोड परिसरातील एसएमआरके महाविद्यालयातही ही परीक्षा सुरू होती.
सायंकाळी ४:३० ते ६:०० या सत्रादरम्यान हॉल क्रमांक ११ मध्ये सहायक अधीक्षक तुषार वडघुले आणि प्रा. सौरभ देशपांडे हे परीक्षा निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. त्यावेळी संशयित मनोज वाघ हा जागेवर बसून छुप्या पद्धतीने मोबाईलचा वापर करत प्रश्नपत्रिकेतील उत्तरे शोधून पेपर सोडवत असल्याचे निरीक्षकांच्या निदर्शनास आले.
मोबाईल जप्त, पोलिसात गुन्हा दाखल
निरीक्षकांनी तातडीने कारवाई करत संबंधित परीक्षार्थ्याकडून मोबाईल हस्तगत केला आणि परीक्षा प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली. परीक्षा केंद्रात कडक सुरक्षा असताना संशयिताने मोबाईल आत कसा नेला, तसेच बाहेरील कोणाशी संपर्क साधून उत्तरे मिळवली जात होती का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील करत आहेत.