सोशल मीडियावर ‘बंपर भरती’ची खोटी जाहिरात भोवली... नाशिकमध्ये बोगस संस्थेचा पर्दाफाश...

Share:
Main Image
Last updated: 28-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २८ ऑगस्ट - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बनावट निविदांचे प्रकरण ताजे असतानाच, आता कुंभमेळ्याच्या नावाखाली नोकरभरतीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घालण्याचा मोठा डाव उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर आरोग्य विभागातील ‘बंपर भरती’ची खोटी जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्या एका संस्थेचा आरोग्य विभागाने भांडाफोड केला असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे शेकडो तरुण-तरुणींची संभाव्य फसवणूक टळली आहे. या प्रकरणी नाशिक परिमंडळाचे सहउपसंचालक डॉ. योगेश भगवान चित्ते यांनी अधिकृत फिर्याद दिली आहे.

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन रतन शिंदे (रा. खर्डा, ता. देवळा), निलेश बबन घोलप (रा. ओतूर, ता. कळवण) आणि विक्रांत विजय सूर्यवंशी (रा. तांबे मळा, संत सावतानगर, पेठरोड) यांच्यासह संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संशयितांपैकी सचिन शिंदे हा एका रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करतो आणि तो या संस्थेचा अध्यक्ष आहे, तर सूर्यवंशी उपाध्यक्ष आणि घोलप सचिव पदावर कार्यरत आहेत.

Advertisement

अशी रचली होती फसवणुकीची जाळी

संशयितांनी आरटीओ परिसरातील सरस्वती हॉस्पिटलसमोर ‘हेल्थफोर्स फाऊंडेशन मल्टी सर्व्हिसेस’ नावाने कार्यालय सुरू केले होते. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांनी ‘सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७ अंतर्गत आरोग्य विभागात बंपर भरती’ अशा आशयाची खोटी जाहिरात तयार करून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल केली.

ही जाहिरात मोठ्या प्रमाणावर पसरल्यानंतर अनेक इच्छुक उमेदवारांनी खातरजमा करण्यासाठी थेट आरोग्य विभागाशी संपर्क साधला. त्यावेळी शासनाकडून अशी कोणतीही भरती प्रक्रिया राबवली जात नसल्याचे स्पष्ट झाले. आरोग्य विभागाने तातडीने हालचाली करत पंचवटी पोलिसांत धाव घेतली आणि हा प्रकार चव्हाट्यावर आणला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार करत असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.