सरप्राईज व्हिजिट अन् थेट कारवाई... १० आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई...

Share:
Main Image
Last updated: 28-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २८ ऑगस्ट - सरकारी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमधील भोंगळ कारभार, अस्वच्छता आणि रुग्णांच्या सेवेतील निष्काळजीपणावर सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. २१ आणि २२ ऑगस्ट रोजी नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील विविध सरकारी आरोग्य संस्थांना दिलेल्या अचानक भेटींनंतर (सरप्राईज व्हिजिट) मंत्री आबिटकर यांनी १० अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

तपासणीत उघड झालेल्या गंभीर त्रुटी:

आरोग्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यात धुळे आणि मालेगाव येथील रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आढळून आली. याशिवाय रुग्णांच्या उपचारात होणारा निष्काळजीपणा, प्रशासकीय कमतरता आणि मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले.

बोगस डॉक्टरांवर कारवाईत हलगर्जीपणा: कार्यक्षेत्रात उघडपणे सराव करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर (Quacks) प्रभावी कारवाई न केल्याबद्दल एका आरोग्य अधिकाऱ्याला थेट जबाबदार धरण्यात आले आहे.

Advertisement

जन आरोग्य समितीचा फियास्को: जन आरोग्य समितीच्या सदस्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची माहिती न देणे आणि नियमित बैठका न घेण्याबाबतही अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढण्यात आले.

वेतन आणि औषध पुरवठ्यात गोंधळ: नाशिक जिल्ह्यातील वरिष्ठ आरोग्य अधिकारीही या चौकशीच्या जाळ्यात आले आहेत. जन कल्याण समित्यांच्या अंमलबजावणीतील अनियमितता, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, औषध पुरवठ्यातील तुटवडा आणि प्रयोगशाळा चाचणी सेवांमधील त्रुटींवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

आरोग्यमंत्र्यांचा कडक इशारा:

"शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलाच पाहिजे. रुग्णांची होणारी गैरसोय, उपचारातील विलंब किंवा आरोग्य प्रशासनातील कोणताही निष्काळजीपणा अजिबात सहन केला जाणार नाही. सार्वजनिक आरोग्य सेवा विस्कळीत करणाऱ्या प्रत्येक घटकाची जबाबदारी निश्चित करून त्याच्यावर कारवाई केली जाईल," असा सज्जड इशारा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.