नाशिक, (प्रतिनिधी) २७ ऑगस्ट - अंबड औद्योगिक वसाहतीत रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या मालट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३० हजार रुपयांचे डिझेल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चालक यशवंत शंकर बरगे (रा. नादवळ, जि. सातारा) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
घटनाक्रम:
बरगे हे बुधवारी (दि. २६) पहाटे आपल्या ताब्यातील मालट्रक (एमएच ०४ केएफ ६२८२) घेऊन शहरात आले होते. अंबड औद्योगिक वसाहतीतील बिन्नी कंपनीसमोर रस्त्याच्या कडेला ट्रक पार्क करून ते केबिनमध्ये झोपले होते. या वेळी चोरट्यांनी संधी साधून उभ्या ट्रकमधून २९ हजार ७१५ रुपये किमतीचे डिझेल काढून पोबारा केला.
सकाळी प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून, हवालदार जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
विसे मळ्यात दिवसा घरफोडी
भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी रोकडवर डल्ला मारला. वर्दळीच्या गंगापूररोडवरील विसेमळा भागात झालेल्या घरफोडीत ८० हजाराची रोकड चोरट्यांनी चोरून नेली असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशा सत्यप्रकाश कनोजिया (रा.रामतिर्थ सोसा.श्रीरंगनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कनोजिया मंगळवारी (दि.२४) सायंकाळच्या सुमारास अल्पशा कामानिमित्त ड्रीम कॅस्टल भागात गेल्या होत्या.
काम आटोपून घरी परतल्यानंतर घरफोडीचा हा प्रकार समोर आला. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे लॉक तोडून कपाटात ठेवलेली ८० हजाराची रोकड चोरून नेली. हवालदार अहिरे या घरफोडीचा तपास करीत आहेत.
वकिल महिलेच्या पर्समधून चोरी
गर्दीची संधी साधत चोरट्यांनी वकिल महिलेच्या पर्स मधून रोकडसह घड्याळ व ओळखपत्र चोरून नेले. हा प्रकार वर्दळीच्या रविवार कारंजा भागात घडला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहिणी धनंजय देशमुख (रा.दत्त मंदिर जवळ धोंगडेनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अॅड देशमुख या बुधवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास कामानिमित्त रविवार कारंजा भागात गेल्या होत्या. समर्थ ज्युस सेंटर समोरून त्या पायी जात असतांना ही घटना घडली. गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांची पर्सची चैन उघडूून मिनी पाकिट चोरून नेले. या पाकिटात सात हजाराची रोकड, घड्याळ व बार काऊन्सिलचे ओळखपत्र होते. हवालदार बागुल या घटनेचा तपास करीत आहेत.