नाशिक, (प्रतिनिधी) २७ ऑगस्ट - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने भाविकांची गर्दी रोखण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी आपल्या तयारीचा वेग वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (General Manager) राजीव श्रीवास्तव यांनी भुसावळ मंडळातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांची नुकतीच पाहणी केली असून कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.
महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी देवळाली, नाशिक रोड, ओढा, कसबे सुकेणे आणि खेरवाडी या रेल्वे स्थानकांना भेट दिली. यावेळी त्यांनी स्थानकांवरील प्रवासी सुविधा, पायाभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था, गर्दीचे व्यवस्थापन (Crowd Management) आणि आणीबाणीच्या प्रसंगी असणारी तयारी या सर्व बाबींची सखोल तपासणी केली.
प्रवासी सुविधा व गर्दी नियंत्रणावर भर:
कुंभमेळ्यादरम्यान लाखो भाविक आणि प्रवाशांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता, रेल्वे स्थानकांवर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि अडथळामुक्त व्हावा यासाठी विशेष उपाययोजना आखल्या जात आहेत.
या पाहणी दौऱ्यादरम्यान भुसावळचे मंडळ रेल्वे व्यवस्थापक (DRM) पुनीत अग्रवाल यांच्यासह भुसावळ विभागातील इतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते. आगामी सिंहस्थ कुंभमेळा सुरळीत पार पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षा आणि प्रवासी सुविधा अधिक मजबूत केल्या जात आहेत.