नाशिक, (प्रतिनिधी) २७ ऑगस्ट - दरमहा निश्चित भाडे देण्याचे आमिष दाखवून भाडेतत्त्वावर घेतलेल्या दोन पिकअप वाहनांचा भामट्यांनी अपहार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात मूळ वाहनमालकांची १० लाख रुपयांची फसवणूक झाली असून अंबड पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय पाटोळे आणि शेख निजामुद्दीन शेख रईद अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित ठकबाजांची नावे आहेत. याप्रकरणी बंटी जनार्दन लोंढे (रा. घरकुल योजना, चुंचाळे शिवार) यांनी फिर्याद दिली आहे.
अशी घडली फसवणूक:
घटना १: संशयितांनी बंटी लोंढे यांच्या मालकीचे पिकअप वाहन (एमएच १५ जेडब्ल्यू १८४१) दरमहा ३७ हजार रुपये भाडे देण्याचे ठरवून १७ जून रोजी भाडे करारनामा केला होता. मात्र, वेळेवर भाडे न मिळाल्याने लोंढे यांनी चौकशी केली असता वाहनाचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले.
घटना २: याच पद्धतीने संशयितांनी समाधान टोंगारे यांचीही फसवणूक करत त्यांच्या मालकीच्या पिकअप वाहनाचा (एमएच १२ पीक्यू ०२१४) अपहार केला.
दोन्ही घटनांमध्ये मिळून सुमारे १० लाख रुपयांची फसवणूक झाली असून, अंबड पोलिसांनी एकत्रित गुन्हा नोंदवला आहे. हवालदार शेळके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.