केशव खेडकर, (नाशिक) २७ ऑगस्ट - विशेष सखोल पुनरीक्षणाचा (SIR) पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला असून, आता पुढील टप्प्यात प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी, हरकती-सुनावणी आणि अंतिम यादीच्या कामाचे काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह नाशिक, धुळे, अहिल्यानगर, जळगाव आणि नंदुरबारचे जिल्हाधिकारी तसेच वरिष्ठ निवडणूक अधिकारी उपस्थित होते.
महत्त्वाचे मुद्दे व सूचना:
पहिल्या टप्प्याचे यश: हाऊस-टू-हाऊस सर्व्हे आणि मतदार नोंदींचे मॅपिंग वेळेत पूर्ण झाल्याबद्दल सर्व जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
दुसऱ्या टप्प्याची तयारी: इलेक्ट्रॉनिक रोल प्रिंटचे काम तातडीने पूर्ण करून प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
गैरसमज दूर करा: अनुपस्थित (Absentee), स्थलांतरित (Shifted), मृत (Dead) आणि दुबार नोंद असलेल्या मतदारांबाबत नागरिकांमध्ये कोणतेही गैरसमज पसरणार नाहीत, याची विशेष दक्षता घेण्याचे आदेश दिले.
ऑनलाइन नोटीस व सुनावणी: नाव वगळलेल्या किंवा आक्षेप असलेल्या मतदारांना नोटीस बजावण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करावा.
नमुना क्र. ६ चा वापर: नाव वगळलेल्या मतदारांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यांना नमुना क्र. ६ भरून देण्याबाबत मार्गदर्शन करावे.
लोकजागृती व सहकार्य: राजकीय प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींच्या बैठका घेऊन तसेच प्रसारमाध्यमांच्या मदतीने या प्रक्रियेची व्यापक जनजागृती करावी.
विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्व जिल्ह्यांना जिल्हा व तालुका स्तरावर या प्रक्रियेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून जनजागृती करण्याचे निर्देश दिले.