रिव्हर्स घेणाऱ्या सिटीलिंक बसच्या धडकेत तरुणी गंभीर... रिक्षा पलटी होऊन माय-लेक जखमी...

Share:
Main Image
Last updated: 27-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २७ ऑगस्ट - शहरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एक २१ वर्षीय तरुणी आणि रिक्षातून प्रवास करणारे माय-लेक गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पंचवटी आणि उपनगर पोलीस ठाण्यात संबंधित वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

१. निमाणी भागात सिटीलिंक बसच्या धडकेत तरुणी गंभीर जखमी

निमाणी परिसरातील ट्रॅफिक पोलीस चौकीसमोर रस्ता ओलांडत असताना सिटीलिंक बसने दिलेल्या धडकेत आरती उर्फ शुभांगी कृष्णा वागळे (वय २१, रा. लाखलगाव) ही तरुणी गंभीर जखमी झाली.

Advertisement

सोमवारी (दि. २४) सायंकाळी काम आटोपून घराकडे परतत असताना 'एमएच १५ जीव्ही ७९३९' या क्रमांकाच्या बसवरील चालकाने अचानक रिव्हर्स घेतल्याने हा अपघात घडला. अपघातात तरुणीच्या पोटास व कमरेस गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी जखमीच्या आई हिरा वागळे यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार निलेश चव्हाण तपास करत आहेत.

२. विहीतगाव शिवारात भरधाव ऑटोरिक्षा पलटी; माय-लेक जखमी

दुसऱ्या घटनेत, वडनेररोडवरील विहीतगाव शिवारात साईग्रॅण्ड लॉन्स परिसरात भरधाव ऑटोरिक्षा पलटी होऊन माय-लेक जखमी झाले. यश मोकळ आणि अंजना मोकळ (रा. उपेंद्रनगर, सिडको) अशी जखमींची नावे आहेत.

गुरुवारी (दि. २०) दुपारी नाशिकरोड रेल्वे स्टेशनकडे 'एमएच १५ जेए २४४२' या रिक्षाने जात असताना चालकाच्या हलगर्जीपणामुळे रिक्षा उलटली. या अपघातात रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून माय-लेक जखमी झाले आहेत. यश मोकळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार बरेलीकर पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.