आधी फोन केला... नंतर थेट बँक खातेच रिकामे केले...

Share:
Main Image
Last updated: 27-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २७ ऑगस्ट - एमएनजीएल (MNGL) कंपनीचे प्रलंबित गॅस बिल भरण्याच्या बहाण्याने एका सायबर भामट्याने व्यावसायिकाला 'एपीके' (APK) लिंक पाठवून त्यांच्या बँक खात्यातून ४ लाख रुपये परस्पर लांबवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर रोड परिसरातील रहिवासी व व्यावसायिक सतीश पगारिया यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पगारिया यांचे कॉलेज रोड भागात कार्यालय आहे. बुधवारी (दि. १९) दुपारी ते कार्यालयात असताना भामट्याने त्यांच्याशी संपर्क साधला.

असा घडला प्रकार:

बनावट कॉल: भामट्याने स्वतःला महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवले आणि गॅस बिल थकीत असल्याचे सांगत ते तात्काळ भरण्यास सांगितले.

Advertisement

जाळ्यात ओढले: पगारिया यांनी बिलाची चौकशी करून रक्कम भरण्याची संमती दर्शवताच, संशयिताने त्यांच्या मोबाईलवर एक 'एपीके लिंक' पाठवली.

खाते रिकामे: पगारिया यांनी ती लिंक उघडताच, भामट्यांनी त्यांच्या 'आयडीबीआय' (IDBI) बँक खात्यातील ४ लाख रुपये इतर विविध खात्यांवर वर्ग करून पळवले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पगारिया यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली. गंगापूर पोलिसांनी याप्रकरणी सायबर गुन्ह्याची नोंद केली असून, पोलीस निरीक्षक जमीर शेख या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पोलीस आवाहन: अज्ञात व्यक्तीने पाठवलेली कोणतीही लिंक अथवा 'APK File' मोबाईलमध्ये डाउनलोड करू नका. गॅस बिल, वीज बिल किंवा इतर कोणत्याही पेमेंटसाठी नेहमी अधिकृत ॲपचाच वापर करा.

Advertisement

Comments

No comments yet.