संतापजनक प्रकार... गतिमंद महिलेच्या विवाहाचे आमिष... पावणेचार लाखांना गंडा...

Share:
Main Image
Last updated: 27-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २७ ऑगस्ट - विवाहाचे बनावट आमिष दाखवून आणि बँकेतील मुदत ठेव (FD) मोडण्यास भाग पाडून एका मानसिकदृष्ट्या अकार्यक्षम महिलेची ३ लाख ६७ हजार १०२ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची खळबळजनक घटना पंचवटी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी मोहन चौधरी असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित भामट्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नरेंद्र भालचंद्र वाघ (रा. लोखंडे मळा, पंचवटी) यांनी तक्रार दिली आहे. नरेंद्र वाघ यांची बहीण चैताली वाघ या मानसिकदृष्ट्या अकार्यक्षम आहेत.

अशी केली फसवणूक:

Advertisement

संशयित माधुरी चौधरी हिने चैताली यांच्याशी जवळीक साधून त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीची व आजारपणाची माहिती मिळवली. चैताली यांच्या विवाहासाठी योग्य स्थळ शोधण्याचे आमिष दाखवून तिने त्यांचा विश्वास संपादन केला. संवादादरम्यान चैताली यांच्या नावे कुटुंबाने बँकेत मुदत ठेव (एफडी) ठेवल्याची माहिती संशयित महिलेला मिळाली.

"लग्नात तुझ्यासाठी सोन्याची साखळी (गोल्ड चेन) खरेदी करावी लागेल," असे सांगत संशयित महिलेने १४ जून रोजी सकाळी कुटुंबीयांची नजर चुकवून चैताली यांना पंचवटीतील स्टेट बैंक ऑफ इंडिया (SBI) च्या शाखेत नेले. तिथे चैताली यांच्या नावावरील एफडी पावती मोडून ती रक्कम स्वतःच्या बँक खात्यात वर्ग करून घेतली.

कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित माधुरी चौधरी हिच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक कैलास जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.