नाशिक जिल्ह्यात कुपोषित बालके किती? अहवालातून झाले उघड... जिल्हाधिकाऱ्यांनी मग...

Share:
Main Image
Last updated: 26-Aug-2026

केशव खेडकर, (नाशिक) २६ ऑगस्ट - नाशिक जिल्ह्यात कुपोषण निर्मूलन मोहीम अधिक प्रभावीपणे राबवतानाच कुपोषित बालकांना सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि योग्य आहारविषयक सेवा तातडीने पुरवाव्यात, असे स्पष्ट निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

३ लाख १२ हजारांहून अधिक बालकांची आरोग्य तपासणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या सूचनेनुसार जुलै महिन्यात जिल्ह्यात विशेष शोध मोहीम राबवण्यात आली होती. आरोग्य विभाग आणि एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या (ICDS) संयुक्त पथकांनी ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी केली.

Advertisement

जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या २६ प्रकल्पांमधील एकूण ३ लाख २३ हजार ३७७ बालकांपैकी ३ लाख १२ हजार २३८ बालकांची तपासणी पूर्ण झाली. या तपासणीत तीव्र कुपोषित (SAM - Severe Acute Malnutrition) ४६३ बालके, तर मध्यम कुपोषित (MAM - Moderate Acute Malnutrition) ३,२०९ बालके आढळली आहेत.

'पोषण दूत' अभियान आणि ग्राम बाल विकास केंद्र

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या सर्व कुपोषित बालकांना तातडीने संदर्भ सेवा (Referral Services), आवश्यक तेथे वैद्यकीय शस्त्रक्रिया आणि संतुलित आहार पुरवण्याचे निर्देश दिले, जेणेकरून ही बालके कुपोषणमुक्त होऊन सर्वसाधारण श्रेणीत येतील.

सध्या नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात 'पोषण दूत' अभियान राबवले जात आहे. कुपोषित बालकांवर पोषण पुनर्वसन केंद्रात (NRC) उपचार सुरू असून, अंगणवाडी स्तरावर 'ग्राम बाल विकास केंद्र' स्थापन करून त्यांच्या आरोग्याचे नियमित निरीक्षण केले जात आहे. सर्व अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आणि बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी (CDPO) स्थानिक ग्रामपंचायतींच्या सहकार्याने कुपोषित बालकांवर बारकाईने लक्ष ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी शेवटी केले.

Advertisement

Comments

No comments yet.