नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा... आमदार पंकज भुजबळ यांच्या सबंधित अधिकाऱ्यांना सूचना

Share:
Main Image
Last updated: 26-Aug-2026

येवला, (प्रतिनिधी) २६ ऑगस्ट - राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली येवला विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न तसेच नागरिकांच्या नागरी समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत येवला संपर्क कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला गती देतानाच नागरिकांच्या दैनंदिन समस्या तातडीने मार्गी लावण्यावर यावेळी विशेष भर देण्यात आला.

या बैठकीत मतदारसंघातील विविध गावांमधील रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन, कृषी, वीज, आरोग्य, ग्रामविकास तसेच इतर पायाभूत सुविधांशी संबंधित विकासकामांचा विभागनिहाय आढावा घेण्यात आला. सुरू असलेल्या विकासकामांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे, आवश्यक प्रशासकीय कार्यवाही आणि नागरिकांच्या मागण्यांबाबत संबंधित पदाधिकारी व अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.

मतदारसंघातील विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत आणि त्याचा थेट लाभ नागरिकांना मिळावा, यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याच्या सूचना आमदार पंकज भुजबळ यांनी दिल्या. विकासकामांमध्ये कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. नागरिकांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहून लोकाभिमुख आणि तत्पर प्रशासन देण्यास प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Advertisement

दरम्यान, बैठकीदरम्यान मतदारसंघातील विविध गावांमधून आलेल्या नागरिक, शेतकरी, ग्रामस्थ तसेच विविध शिष्टमंडळांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेण्यात आल्या. नागरिकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार पंकज भुजबळ यांनी दिले. अनेक तक्रारींवर जागेवरच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तत्काळ तोडगा काढण्यात आला.

शेतकऱ्यांच्या कृषीविषयक अडचणी, पाणीपुरवठ्याच्या समस्या, रस्त्यांची दुरवस्था, गावातील मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या. प्रत्येक प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही करून त्याचा पाठपुरावा करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

या आढावा बैठकीस स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, शेतकरी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Comments

No comments yet.