नाशिक पोलिसांचा धाक संपला? शहरात बिनधास्त फिरताय तडीपार...

Share:
Main Image
Last updated: 25-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २५ ऑगस्ट -  पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार (हद्दपार) केलेले असतानाही शहरात बिनधास्त वावरणाऱ्या ३ संशयित गुंडांच्या नाशिक पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शहर गुन्हे शाखेचे युनिट २, गुंडा विरोधी पथक आणि इंदिरानगर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करत या तडीपारांना बेड्या ठोकल्या.

१. देवळाली कॅम्प येथे गुन्हे शाखेकडून कारवाई:

संशयित: आयजेक उर्फ गोलू जोशीला बाबू (वय २४, रा. कॅथे कॉलनी, देवळाली कॅम्प).

कारवाई: शहर व जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार असलेला गोलू बाबू रेल्वे स्टेशनकडून भरूरच्या दिशेने जात असताना युनिट २ च्या पथकाने चंद्रमणी चौकात त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार गुंजाळ तपास करत आहेत.

२. धात्रक फाटा येथून घरातून अटक:

Advertisement

संशयित: आदित्य राजेंद्र पाटोळे (वय २०, रा. नवकार सोसा., निशांत गार्डनजवळ, धात्रकफाटा).

कारवाई: गुंडा विरोधी पथकाने थेट त्याच्या घरात शिरून त्याला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून हवालदार भुजबळ पुढील तपास करत आहेत.

३. वडाळागावात इंदिरानगर पोलिसांची कारवाई:

संशयित: सदाशिव उर्फ शिव पिराजी गायकवाड (वय ३८, रा. म्हाडा वसाहत, वडाळागाव).

कारवाई: कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची लेखी परवानगी न घेता वडाळागावातील बंटी कॉर्नर भागात फिरत असताना इंदिरानगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. हवालदार पवार या प्रकरणाचा तपास करत आहेत.

शहर पोलिसांनी गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी हद्दपारीचे आदेश दिलेल्या गुन्हेगारांवर ही कारवाई केली असून, आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कडक पावले उचलली जात आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.