मनोहर शिंदे, (नाशिक) २५ ऑगस्ट - मंदिरे, लेण्या, गोदाकाठ आणि समृद्ध सांस्कृतिक वारशामुळे ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या वैभवात आता येथील ऐतिहासिक चांदी उद्योगाची भर पडणार आहे. नाशिकची चांदी तिच्या उच्च दर्जाच्या शुद्धतेसाठी आणि कारागिरीसाठी जगभर प्रसिद्ध असून, तिला जागतिक पर्यटन नकाशावर आणण्यासाठी पर्यटन विभाग विशेष प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन पर्यटन विभागाचे उपसंचालक नंदकुमार राऊत यांनी केले. पर्यटकांना या परंपरेची ओळख करून देण्यासाठी नियमितपणे ‘चांदीची सफर’ हेरिटेज वॉक आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) आणि नाशिक सराफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चांदीला जाणून घेऊया’ या विशेष हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात चांदी निर्मितीची प्रत्यक्ष प्रक्रिया, पारंपरिक कारागिरी आणि ऐतिहासिक सराफ बाजाराचा वारसा उपस्थितांसमोर उलगडण्यात आला.
भक्तीस्थळांसोबतच व्यापाराच्या ‘शक्तीस्थळां’चा विकास
यावेळी बोलताना नंदकुमार राऊत म्हणाले की, नाशिकच्या चांदीच्या वस्तू, भांडी, देवदेवतांच्या मूर्ती आणि मंदिरांच्या साहित्याला जगभरात प्रचंड मागणी आहे. शहरातील भक्तीस्थळांसोबतच अशा व्यापाराच्या ‘शक्तीस्थळांना’ जगासमोर आणण्याची गरज आहे. नाशिकच्या चांदीचे हे वैभव अधिक व्यापक करण्यासाठी सराफ असोसिएशनच्या मागण्या पर्यटन विभागामार्फत शासनापर्यंत पोहोचवून चांदीला पर्यटनाचा अधिकृत दर्जा मिळवून दिला जाईल.
हेरिटेज वॉक ठरतोय नवा दुवा
वारशाची जपणूक: गोल्ड व्हॅल्यूअर असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर यांनी सांगितले की, नाशिक सराफ बाजाराचा इतिहास आणि कारागिरी नव्या पिढीसह देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचण्यासाठी नियमित हेरिटेज वॉक उपयुक्त ठरतील.
पर्यटन संचालकांची भेट घेणार: आयबीजेए उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी स्पष्ट केले की, पारंपरिक सोने-चांदी बाजाराला हेरिटेज पर्यटनाचा दर्जा मिळावा आणि ‘चांदीची सफर’ ही नियमित सुरू व्हावी, यासाठी लवकरच पर्यटन संचालकांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली जाईल.
या उपक्रमाला नाशिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे, चांदी उत्पादक संघाचे सतीश सोनवणे, महेश घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर वडनेरे यांनी केले, तर त्रिवेणी घाडगे यांनी आभार मानले.