१९३२ ते आजवरचा 'सिंहस्थ' एकाच छताखाली... नाशिकमध्ये रंगणार दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन...

Share:
Main Image
Last updated: 26-Aug-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) २६ ऑगस्ट -  गोदावरीच्या पावन तीरावर शतकानुशतके अविरत प्रवाहित होत आलेली श्रद्धा, अध्यात्म, संस्कृती आणि संतपरंपरेचा वारसा म्हणजे नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा. या वैभवशाली परंपरेच्या सुवर्णपानांना छायाचित्रांच्या माध्यमातून पुन्हा एकदा उजाळा देण्याचा अभिनव उपक्रम रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्स आणि नासिक प्रेस फोटोग्राफर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष प्रदर्शनाच्या स्वरूपात 28 ते 30 ऑगस्टपर्यंत डॉ. सुनंदा म. गोसावी आर्ट गॅलरी, गुरुदक्षिणा हॉल, कॉलेजरोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ नाईन हिल्सचे अध्यक्ष अभय नेरकर व प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक धनंजय बेळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री  गिरीश महाजन,महापौर हिमगौरी आडके,उपमहापौर विलास शिंदे यांच्या सह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी मा.नगरसेवक, विविध क्षेत्रांतील मान्यवर, इतिहासप्रेमी, कलारसिक, छायाचित्रप्रेमी तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या प्रदर्शनात देशभरातील व विशेषतः नाशिक शहरातील १५ हून अधिक  प्रेस फोटोग्राफर्सनी काळजीपूर्वक जतन केलेली गेल्या काही सिंहस्थ कुंभमेळ्याची दुर्मिळ,अप्रकाशित आणि आजवर सर्वसामान्यांच्या नजरेपासून दूर राहिलेली छायाचित्रे रसिकांना पाहता येणार आहेत. सन १९32 पासूनच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ऐतिहासिक आठवणींचा छायाचित्ररूपी अमूल्य ठेवा या प्रदर्शनातून उलगडणार आहे.काळाच्या पडद्याआड गेलेली माणसे, बदललेले नाशिक, साधू-संतांचे आखाडे, शाही स्नानाची परंपरा, भाविकांचा महासागर, धार्मिक विधी, तत्कालीन सामाजिक जीवन आणि कुंभमेळ्याचे बदलते स्वरूप अशा अनेक आठवणी या छायाचित्रांमधून जिवंत होणार आहेत. त्यामुळे हे प्रदर्शन केवळ छायाचित्रांचे नसून नाशिकच्या सांस्कृतिक स्मृतींच्या पुनर्भेटीचे एक भावस्पर्शी दालन ठरणार आहे,असेही नेरकर व बेळे यांनी पुढे नमूद केले.

सिंहस्थ म्हणजे केवळ एक धार्मिक पर्व नव्हे, तर भारतीय  संस्कृतीतील विविध प्रवाहांना एकत्र आणणारा श्रद्धेचा महासंगम आहे. या परंपरेचा इतिहास, लोकजीवन, संस्कृती, श्रद्धा आणि सामाजिक परिवर्तनाचा प्रवास छायाचित्रांच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर मांडण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून करण्यात आला आहे. जुन्या काळातील सिंहस्थाचे क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करणाऱ्या पत्रकार आणि छायाचित्रकारांच्या नजरेतून त्या काळाचे नाशिक अनुभवण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.

Advertisement

‘जपलेला इतिहास... टिपलेली संस्कृती... आणि छायाचित्रांतून अनुभवता येणारा सिंहस्थ!’ या संकल्पनेतून साकारलेले हे प्रदर्शन नाशिकच्या सांस्कृतिक वैभवाचा आरसा ठरणार आहे. काळाच्या ओघात विस्मृतीत जाणाऱ्या आठवणींना पुन्हा उजाळा देत इतिहासाच्या पाऊलखुणा वर्तमानाशी जोडणाऱ्या या अनोख्या उपक्रमाला नाशिककरांनी, कलारसिकांनी आणि इतिहासप्रेमींनी आवर्जून भेट देऊन लाभ घ्यावा असे आवाहनही आयोजकांनी केले.

या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून नाशिक कर नागरिक हे येणाऱ्या कुंभमेळ्याचे यजमान असल्याने या प्रदर्शनातून कुंभमेळ्याची व्याप्ती ही सर्वांच्या लक्षात येईल व त्यातूनच यजमान रुपी स्वयंसेवक तसेच भोजन व्यवस्था,सहाय्यक व्यवस्था, निवास व्यवस्था, अशा स्वरूपाच्या जबाबदाऱ्या उचलण्यासाठी सुद्धा युवकांना तरुणांना व नाशिककर नागरिकांना पुढे येण्यासाठी प्रेरणा मिळेल व या प्रदर्शनरुपी माध्यमातून या सर्वांचा डेटा संकलित करून  एकत्रित करण्याचा सुद्धा रोटरी क्लब ऑफ नासिक नाईन हिल्स चा प्रयत्न असल्याचे यावेळेस या प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक धनंजय बेळे यांनी नमूद केले.

पत्रकार परिषदेस रोटरी क्लब नाईन हिल्सचे सचिव हर्षद बेळे, कार्यकारी सचिव अभिषेक व्यास माजी अध्यक्ष धनंजय बेळे, जयंतराव गोसावी,विश्वास शिंपी,ललित पगार,अजय चव्हाण, विराज गडकरी, तसेच नासिक प्रेस फोटोग्राफर असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य आदी उपस्थित होते.

दोघांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या प्रदर्शनाला नाशिककर नागरिकांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन रोटरी क्लब व प्रेस फोटोग्राफर या दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.