नाशिक, (प्रतिनिधी) २५ ऑगस्ट - प्लॉट खरेदी-विक्रीच्या व्यवहारात एका व्यक्तीला तब्बल ७ लाख २० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. व्यवहार होऊन १० वर्षे उलटूनही संशयिताने प्लॉटचे खरेदीखत करून न दिल्याने अखेर हे प्रकरण पोलिसांत पोहोचले असून, उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित अन् फिर्यादी:
या प्रकरणी सुशांत चंद्रकुमार बचके (वय ४३, रा. वैभव हौ. सोसा., उपनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विलासराज मोहनराव गायकवाड (रा. राजगृह बंगला, मोरे मळा, पंचक जेलरोड) या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका प्रकार काय?
संशयित विलासराज गायकवाड याने दसक शिवारातील शेतजमीन गट क्रमांक ७८-११ (२८ आर) आणि गट क्रमांक ७८-८ (क्षेत्र ४२) या मिळकतीमधील मंजूर प्लॅनमधील प्लॉट नंबर ०७ (क्षेत्र १०० चौ.मी. म्हणजेच १ गुंठा) या प्लॉटचा व्यवहार सुशांत बचके यांच्याशी केला होता.
नोटरी अन् पैसे: सन २०१६ मध्ये नोटरी दस्तावर विक्री करारनामा करण्यात आला होता. यामध्ये गंगाधर शंकर मोरे आणि छगन विठ्ठल लोखंडे यांनी विक्री करण्याचे स्पेशल मुखत्यारपत्र (Power of Attorney) दिल्याचे नमूद होते.
फसवणूक: या व्यवहारापोटी संशयिताने बचके यांच्याकडून वेळोवेळी ७ लाख २० हजार रुपये स्वीकारले. मात्र, १० वर्षे उलटूनही संशयिताने प्लॉटचे खरेदीखत करून दिले नाही.
पैसे देऊनही आणि वारंवार पाठपुरावा करूनही संशयित टाळाटाळ करत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे बचके यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पावरा करत आहेत.