मनोहर शिंदे, (नाशिक) २५ ऑगस्ट - सिंहस्थ महाकुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने साधुग्राम आणि मंडप व्यवस्थेच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला आहे. कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २०१५ च्या कुंभमेळ्यात प्रत्यक्ष काम केलेल्या महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा वापर करून २०२७चे नियोजन अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.
एकात्मिक पायाभूत सुविधांवर भर
साधुग्राममधील सर्व सुविधा स्वतंत्रपणे उभारण्याऐवजी सर्व यंत्रणांचा परस्पर समन्वय साधून एकात्मिक नियोजन (Integrated Planning) करण्यावर बैठकीत विशेष चर्चा झाली:
मंडप व कॅम्प व्यवस्था: साधुग्राममध्ये आखाड्यांसाठीचे मंडप, विविध पंडाल, सार्वजनिक निवास व्यवस्था, व्हीआयपी कॅम्प आणि कुंभमेळा कार्यालयांची रचना निश्चित केली जात आहे.
अत्यावश्यक सेवा: वीज, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, स्वच्छता, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था, पोलिस, अग्निशमन सेवा आणि प्रथमोपचार केंद्रांचे एकत्रित नियोजन केले जाईल.
नोडल यंत्रणा व एकसमान दर: विविध विभागांना लागणाऱ्या समान साहित्यासाठी एकसमान निविदा दर पद्धती लागू करणे आणि मंडप व्यवस्थेसाठी नोडल यंत्रणा निश्चित करण्याबाबत चर्चा झाली.
२०१५ च्या अनुभवातून सुधारणा
या आढावा बैठकीला नाशिक महापालिकेच्या निवृत्त शहर अभियंत्यांसह अनेक माजी अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. २०१५ च्या कुंभमेळ्यात प्रत्यक्ष काम करताना आलेल्या अडचणी, प्रभावी ठरलेल्या व्यवस्था आणि प्रत्यक्ष गर्दीच्या वेळेस लागणाऱ्या सोयीसुविधांबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. नियोजनाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच या अनुभवांचा समावेश केल्याने संभाव्य अडचणी आधीच दूर करता येतील, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले.
या बैठकीस नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.