नाशिक, प्रतिनिधी (२४ ऑगस्ट २०२६) -
घरात कुणी नसल्याची संधी साधत मोलकरणीने कपाटातील सव्वा दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पळविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित घरमालकाच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित मोलकरणीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी: जया संजय घावटे (रा. यमुनानगर, चांदशी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित मोलकरणीचे नाव आहे.
फिर्यादी: दीपेश उमेश वैश्य (रा. लक्ष्मीनारायण विला, प्रमोद नगर, गंगापूर रोड) यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
नेमकं काय घडलं
गेल्या बुधवारी (दि. १९) सकाळी दीपेश वैश्य यांच्या पत्नी अल्पावधीच्या कामासाठी घराबाहेर पडल्या होत्या.
घर रिकामे असल्याचे पाहून मोलकरणीने बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे २ लाख २२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे अलंकार चोरून नेले.
घरमालक परतल्यानंतर दागिने गायब असल्याचे निदर्शनास आले. वैश्य दांपत्याने तातडीने गंगापूर पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार महाले करत आहेत.
बांधकामाच्या ठिकाणी स्टीलची चोरी
बांधकाम साईटवरून चोरट्यांनी स्टील चोरून नेले. ही घटना राठी अमराई भागात घडली असून यात सुमारे ४५ हजार रूपये किमतीच्या लोंखंडावर भामट्यांनी डल्ला मारला.
याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायीक अल्पशे अशोक सामसुका (रा.चोपडा लॉन्स जवळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
सामसुका यांची राठी आमराई भागात नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकाम साईटवर ठेवलेले सुमारे एक हजार किलो वजनाचे आठ व दहा एमएम असलेले स्टील चोरट्यांनी चोरून नेले. हवालदार खोडे या घटनेचा तपास करीत आहेत.