अमरावती, प्रतिनिधी (२४ ऑगस्ट २०२६) -
येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (SNCU) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत तीन निष्पाप नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला असून, संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पहाटेच्या सुमारास घडली दुर्घटना
अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील SNCU विभागात कमी दिवसांच्या, कमी वजनाच्या आणि गंभीर बालकांवर उपचार सुरू असतात. सोमवारी पहाटेच्या सुमारास सुमारे ५० ते ६० नवजात बालके या विभागात उपचार घेत असताना अचानक आग लागली. घटनेचे गांभीर्य ओळखून रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य हाती घेत इतर बालकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी धावपळ सुरू केली; मात्र दुर्दैवाने तीन बालकांचा जीव वाचवता आला नाही.
इतर बालकांना उपचारासाठी हलवले
घटनेनंतर तातडीने इतर बालकांना इतरत्र हलवण्यात आले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार,
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे ४ बालकांवर उपचार सुरू असून, त्यातील एका बालकाची प्रकृती गंभीर आहे (हाता-पायाला भाजले आहे), तर ३ बालके किरकोळ भाजली आहेत. काही बालकांना पुढील उपचारासाठी पीडीएमसी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.
सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असला, तरी व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळेच ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. या दुर्घटनेमुळे शासकीय रुग्णालयांमधील फायर ऑडिट आणि सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमधून तीव्र संताप व हळहळ व्यक्त होत आहे. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा सविस्तर तपशील अधिकृत तपासणीनंतरच स्पष्ट होईल.