केशव खेडकर, (नाशिक) २३ ऑगस्ट - सिंहस्थ कुंभमेळ्यात १२ कोटींपेक्षा अधिक भाविकांची संभाव्य उपस्थिती लक्षात घेता, प्रशासनाने नियोजनासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि आयआयटी मुंबई (IIT Bombay) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महासिंहस्थ टेक मंथन’ आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत सुरक्षितता, स्वच्छता, वाहतूक नियंत्रण आणि माहितीच्या व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व नवोन्मेषाचा (Innovation) वापर केला जाईल.
‘कुंभ इनोव्हेशन चॅलेंज २०२६’: ६ महत्त्वाच्या विषयांवर भर
या टेक मंथनाचा एक भाग म्हणून स्टार्टअप्स, टेक कंपन्या, संशोधक आणि GovTech संस्थांसाठी ‘कुंभ इनोव्हेशन चॅलेंज’ जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये ६ मुख्य विषयांवर आधारित तंत्रज्ञानाधारित उपाय शोधले जातील:
First Hour@Kumbh: कुंभनगरीत प्रवेश करताना भाविकांना वाहतूक, आरोग्य, घाट व स्वच्छतागृहांची माहिती सहज मिळवून देणे.
Swachh Kumbh 360°: स्वच्छतागृहांची निगराणी, कचरा व्यवस्थापन आणि रिअल-टाइम नियोजनावर भर.
Kumbh SOS Grid: आपत्कालीन परिस्थितीत भाविकांना मदत केंद्र, पोलिस आणि वैद्यकीय पथकांशी जोडणे.
Godavari Guardian: गोदावरी नदीच्या पाण्याचे प्रदूषण रोखणे, गुणवत्ता तपासणे आणि पर्यावरणाचे रक्षण.
TruthShield Kumbh: अफवा, फेक न्यूज आणि डीपफेक रोखून विश्वासार्ह माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे.
Kumbh Memories: डिजिटल व ऑडिओ-व्हिडिओ माध्यमांद्वारे कुंभाचा सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करणे.
सप्टेंबर २०२६ मध्ये मुख्य कार्यक्रम; अर्ज प्रक्रिया सुरू
‘महासिंहस्थ टेक मंथन’चा मुख्य कार्यक्रम सप्टेंबर २०२६ मध्ये पार पडणार असून, यादरम्यान ‘AI आणि श्रद्धा’, ‘कुंभाचा डिजिटल वारसा’ आणि ‘Sovereign AI’ यांसारख्या विषयांवर प्रमुख चर्चासत्रे होतील. कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले की, या तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ कुंभमेळ्यापुरता मर्यादित न राहता, नाशिकच्या भविष्यातील दीर्घकालीन विकासासाठी डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केला जाईल.
या चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जाचा फॉर्म ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत कुंभमेळा प्राधिकरणाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर (@ntkma2027) उपलब्ध आहे.