मनोहर शिंदे, (नाशिक) २७ ऑगस्ट - नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने आयोजित 'कुंभ भक्ती संगम' या तीन दिवसीय अध्यात्मिक व सांस्कृतिक महामहोत्सवाला आज (शुक्रवार, २८ ऑगस्ट) पासून मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. नाशिक शहरातील 'ठक्कर डोम' येथे २८ ते ३० ऑगस्ट दरम्यान रंगणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी ४:३० वाजता होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील अर्धा डझन प्रमुख मंत्री आणि देशभरातील नामवंत संत-महंत उपस्थित राहणार आहेत.
महोत्सव एका दृष्टिक्षेपात:
कालावधी: २८ ते ३० ऑगस्ट २०२६
स्थळ: ठक्कर डोम, नाशिक
आयोजक: नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण
दिग्गज मंत्र्यांची उपस्थिती
महोत्सवाच्या उद्घाटनास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिक्षण मंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, पालकमंत्री गिरीश महाजन, पणनमंत्री जयकुमार रावल आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उइके हे उपस्थित राहणार आहेत.
तीन दिवसांचे भरगच्च कार्यक्रम आणि वेळापत्रक:
दिवस पहिला: शुक्रवार, २८ ऑगस्ट
दुपारी ४:३० वा.: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भव्य उद्घाटन.
सायंकाळी ५:३० ते ७:०० वा.: अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन.
रात्री ८:०० ते १०:०० वा.: सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांची 'अभंगवारी'.
दिवस दुसरा: शनिवार, २९ ऑगस्ट (भक्ती संमेलन)
सकाळी १० ते १२ (सत्र १): 'सिंहस्थ महाकुंभमेळा: भारतीय संत आणि समरसता' (समन्वयक: पराग महाराज चातुर्मासे).
दुपारी २ ते ४ (सत्र २): 'सिंहस्थ महाकुंभमेळा: राष्ट्रीयदृष्ट्या संतपरंपरेचा सहभाग आणि समन्वय' (समन्वयक: डॉ. सदानंद मोरे).
सायंकाळी ५:०० ते ७:०० वा.: डॉ. चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांचे कीर्तन.
रात्री ८:०० ते १०:०० वा.: प्रसिद्ध गायिका कु. मैथिली ठाकूर यांचा विशेष भजन कार्यक्रम.
दिवस तिसरा: रविवार, ३० ऑगस्ट (विविधता व सांगता)
दुपारी ३:०० ते ८:०० वा.: श्री दरबार साहिब (अमृतसर) येथील भाई मनिंदर सिंह हजुरी रागी यांचे 'गुरबाणी शबद कीर्तन'.
सायंकाळी ४:०० ते ५:०० वा.: मणिपूरच्या पारंपरिक 'नट संकीर्तन' महाजेग्याचे सादरीकरण.
सायंकाळी ५:०० ते ७:०० वा.: ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता.
विनामूल्य प्रवेश व पार्किंगची सुसज्ज व्यवस्था
या महोत्सवासाठी कोणत्याही पास किंवा तिकिटाची आवश्यकता नसून प्रवेश पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला आहे. भाविक आणि रसिकांची मोठी गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलीस आणि प्रशासनाकडून पार्किंग आणि गर्दी नियंत्रणाचे चोख नियोजन करण्यात आले आहे.
विशेष नियम व आवाहन
आयोजकांनी आणि कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी नागरिकांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच:
शबद कीर्तनाच्या वेळी अध्यात्मिक भाव जपत भाविकांनी आपले शिर झाकून (रुमाल/ओढणी) ठेवावे.
परिसरातील स्वच्छता आणि पावित्र्य राखण्यासाठी तंबाखू, गुटखा, पान किंवा सिगारेट सेवनास पूर्णपणे बंदी असेल.