परभणी, (प्रतिनिधी) २३ ऑगस्ट - NEET आणि TET परीक्षांमधील गोंधळानंतर आता नर्सिंग परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राबाहेर पाठवल्याचा धक्कादायक प्रकार परभणीत उघडकीस आला आहे. परीक्षा केंद्रावर सुरक्षेची आणि पर्यवेक्षणाची जबाबदारी असलेल्या महिला पर्यवेक्षिकेनेच मोबाईलचा वापर करून प्रश्नपत्रिकेचे फोटो काढून बाहेर पाठवल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे.
पर्यवेक्षिकेनेच बहिणीला पाठवला व्हॉट्सॲपवर फोटो
ही घटना २० ऑगस्ट रोजी परभणी शहरातील 'इंदिरा गांधी ANM नर्सिंग स्कूल' येथे घडली. महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळाच्या GNM प्रथम वर्षाची परीक्षा सुरू होती. सकाळी १०:२९ वाजेच्या सुमारास परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेल्या राखी चव्हाण यांनी नियम धाब्यावर बसवून मोबाईलद्वारे प्रश्नपत्रिकेचे फोटो काढले. त्यानंतर हे फोटो त्यांनी व्हॉट्सॲपद्वारे आपली बहीण राणी चव्हाण हिला पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
केंद्र निरीक्षकांच्या प्रसंगावधानाने प्रकार उघड
परीक्षा केंद्रात मोबाईल वापरास सक्त मनाई असतानाही प्रश्नपत्रिका बाहेर जात असल्याचा संशय केंद्र निरीक्षक विश्वजीत मठपती यांना आला. त्यांनी तातडीने संबंधित महिला पर्यवेक्षिकेच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्यात प्रश्नपत्रिकेचे फोटो मिळून आले. यानंतर तात्काळ पोलिसांना पाचारण करून घटनेची माहिती देण्यात आली.
५ जणांवर गुन्हा; ४ जणांना अटक
केंद्र निरीक्षकांच्या तक्रारीवरून नानलपेठ पोलिसांनी राखी चव्हाण, राणी चव्हाण, प्रतीक्षा किरण खिल्लारे, ईश्वर बाराबोईना आणि दिलीप बोरकर या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.
ही प्रश्नपत्रिका पुढे आणखी कोणाकोणाला पाठवण्यात आली होती, यामागे मोठे रॅकेट किंवा आर्थिक गैरव्यवहार आहे का? याचा कसून तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे आरोग्य शिक्षण क्षेत्रातील परीक्षांच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे