नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २३ ऑगस्ट - देशातील लहान मुलांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेता केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. चार वर्षांखालील लहाना मुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या क्लोरफेनिरामाइन मॅलिएट (Chlorpheniramine Maleate) आणि फेनिलेफ्रिन हायड्रोक्लोराईड (Phenylephrine Hydrochloride) या घटकांचा समावेश असलेल्या सर्व प्रकारच्या 'फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन्स' (FDCs) औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर सरकारने निर्बंध लादले आहेत.
४ वर्षांखालील मुलांसाठी धोकादायक!
तज्ज्ञ समिती आणि औषध तांत्रिक सल्लागार मंडळाच्या (DTAB) शिफारशींनुसार सरकारने हा निर्णय घेतला आहे. या औषधांच्या मिश्रणाचा वापर चार वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो, तसेच बाजारात यापेक्षा अधिक सुरक्षित औषधी पर्याय उपलब्ध असल्याने हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.
अधिसूचनेतील प्रमुख निर्देश:
इशारा छापणे अनिवार्य: औषध उत्पादक कंपन्यांनी आपल्या औषधांच्या वेष्टनावर, पाकिटावर आणि सोबतच्या साहित्यावर "चार वर्षांखालील मुलांसाठी हे औषध वापरू नये" असा स्पष्ट इशारावजा मजकूर छापणे आता अनिवार्य करण्यात आले आहे.
नव्या अधिसूचनेनुसार व्यापक कडक कारवाई: यापूर्वी १५ एप्रिल २०२५ रोजी सरकारने केवळ काही विशिष्ट एफडीसींवर अटींसह निर्बंध घातले होते. मात्र, २२ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या नव्या अधिसूचनेनुसार आता या दोन घटकांचा समावेश असलेल्या सर्वच प्रकारच्या औषधी मिश्रणांना हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी 'औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा, १९४०' च्या कलम २६-A अन्वये ही अधिसूचना जारी करण्यात आली असून ती तातडीने लागू करण्यात आली आहे. पालकांनी आपल्या लहान मुलांना सर्दी-खोकल्याची औषधे देताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांकडून केले जात आहे.