नाशिक, (प्रतिनिधी) २२ ऑगस्ट - शहरात परिचित व्यक्तींकडूनच महिला आणि तरुणी असुरक्षित असल्याचे संतापजनक वास्तव समोर आले आहे. दोन वेगवेगळ्या भागांत परिचितांनीच महिलांचा विनयभंग केल्याच्या घटना घडल्या आहेत. एकाने पाठलाग करत तर दुसऱ्याने मोबाईलवरून अश्लील वक्तव्य करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी इंदिरानगर आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
इंदिरानगर प्रकरण: मोबाईलवर संपर्क साधून अडवला रस्ता
कार्तिक जाधव असे संशयिताचे नाव आहे. त्याने परिचित असलेल्या पीडितेला वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून वारंवार संपर्क साधून त्रास दिला. त्यानंतर २९ जुलै रोजी सकाळी वडाळागावातील सिराज किराणा दुकान परिसरात पीडितेची वाट अडवून, "तू मला खूप आवडते, माझे तुझ्यावर प्रेम आहे" अशी बतावणी करत शिवीगाळ केली. "तू माझी झाली नाहीस तर तुला सोडणार नाही," अशी धमकी दिल्याने पीडितेने इंदिरानगर पोलिसांत तक्रार दाखल केली. हवालदार डोळस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अंबड प्रकरण: मंदिरात गाठून महिलेचा विनयभंग
दुसरी घटना सिडको परिसरात घडली. भागवत शिंदे असे संशयिताचे नाव असून तो पीडित महिलेच्याच सोसायटीत राहतो. तो नेहमी महिलेकडे पाहून अश्लील हावभाव करत असे. सोमवारी (दि. १७) त्याने महिलेचा पाठलाग केला आणि परिसरातील महादेवाच्या मंदिरात तिला गाठून विनयभंग केला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार देशमुख तपास करत आहेत.
परिचित व्यक्तींकडूनच अशा घटना घडत असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.