प्रेयसी आणि मित्रांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या... चिठ्ठीत धक्कादायक गौप्यस्फोट...

Share:
Main Image
Last updated: 22-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २२ ऑगस्ट - प्रेयसीसह मित्रांच्या सततच्या जाचाला, आर्थिक लुटीला आणि मारहाणीला कंटाळून एका २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची संतापजनक घटना ध्रुवनगर भागात घडली आहे. मृत्यूपूर्वी तरुणाने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली असून, त्याद्वारे हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात एका तरुणीसह तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयितांची नावे आणि गुन्हा

भावकी व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आश्लेषा शिंदे, अक्षय कडलग आणि अविनाश गायकर अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी मृत तरुणाचे वडील भाऊसाहेब बाळू भामरे (रा. गोकुळ अपार्टमेंट, गोपीनाथ मुंडे जलकुंभाजवळ, ध्रुवनगर) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा वरूण भाऊसाहेब भामरे (वय २६) याने गुरुवारी (दि. २०) सायंकाळच्या सुमारास राहत्या घरात गळफास लावून जीवन संपवले.

Advertisement

'तू मर, नाही तर...'; सुसाईड नोटमधील गंभीर आरोप

वरूण याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये संशयितांवर गंभीर आरोप केले आहेत. प्रेयसीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक केली, हवी तेवढी रोख रक्कम (कॅश) काढून घेतली आणि त्यानंतर धमकावले. इतकेच नव्हे तर रस्त्यात अडवून मारहाण करत "तू मर नाही तर..." अशी धमकी दिल्याचा स्पष्ट उल्लेख चिठ्ठीत करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्तांकडे न्यायाची मागणी

"प्रतीक्षा करावी लागली तरी चालेल, पण संशयितांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे," अशी आर्त हाक वरूण याने सुसाईड नोटच्या माध्यमातून थेट नाशिकच्या पोलीस आयुक्तांना केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस उपनिरीक्षक निकम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.