नाशिक, (प्रतिनिधी) २२ ऑगस्ट - लग्न जुळवून देण्याचे आमिष दाखवून स्मशानात मध्यरात्री अघोरी पूजा मांडत गुजरातच्या एका महिलेची ७७ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी भोंदू विशाल रामदास खंडागळे (रा. फुलेनगर, पंचवटी) आणि त्याचा साथीदार म्हणजेच पीडितेचा प्रियकर जितू अण्णाराव पवार या दोघांना अटक केली आहे. ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या (अंनिस) तत्पर पाठपुराव्यामुळे हा गुन्हा उघडकीस आला.
नेमकी घटना काय?
ओळख आणि फसवणूक: गुजरातच्या वलसाड येथील पीडित महिलेची चार वर्षांपूर्वी नाशिकच्या जितू पवार याच्याशी ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले. लग्नाचे आश्वासन देऊन जितूने नंतर नकार दिला व महिलेला मारहाण केली.
भोंदूचा हस्तक्षेप: जितूसोबत भगतगिरी करणाऱ्या विशाल खंडागळे या भोंदूने महिलेला लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून नाशिकला बोलावले.
स्मशानात अघोरी कृत्य: भोंदूने अमरधाम स्मशानभूमीत मध्यरात्री प्रेताच्या जळालेल्या जागेवर महिलेला बसवून प्रेताची राख, लिंबू आणि लाह्या अंगावर फेकत अघोरी पूजा केली.
आर्थिक लूट व धमकावणे: या पूजेच्या नावाखाली भोंदूने महिलेकडून ऑनलाइन माध्यमातून तब्बल ७७ हजार रुपये उकळले. लग्न न जमल्याने महिलेने पैसे परत मागितले असता दोघांनी तिला मारहाण व दमदाटी केली.
‘अंनिस’च्या मध्यस्थीने पोलिसांत धाव
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने नाशिकमधील ‘महाराष्ट्र अंनिस’च्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. कार्यकर्त्यांनी तत्काळ भद्रकाली पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करण्याचे विनंती पत्र दिले. पोलिसांनी पुराव्यांची पडताळणी करत जादूटोणाविरोधी कायदा व इतर कलमांनुसार गुन्हा नोंदवून दोन्ही संशयितांना तात्काळ अटक केली.
या कारवाईसाठी 'महाराष्ट्र अंनिस'चे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे, प्रल्हाद मिस्त्री, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे, महेंद्र दातरंगे, रंजन लोंढे यांनी विशेष पाठपुरावा केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिराजउद्दीन शेख करत आहेत.