नाशिक, (प्रतिनिधी) २२ ऑगस्ट - प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक महेंद्र लक्ष्मण थोरात हे गेल्या तीन वर्षांहून अधिक काळापासून कोणतीही पूर्वसूचना अथवा रजेचा अर्ज न देता अनधिकृतपणे गैरहजर आहेत. प्रशासनाने अखेर जाहीर नोटीस बजावून त्यांना बाजू मांडण्यासाठी १५ दिवसांची अंतिम संधी दिली असून, मुदतीत हजर न झाल्यास एकतर्फी सेवा समाप्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
नेमके प्रकरण काय?
महेंद्र थोरात हे ११ एप्रिल २०२३ पासून कार्यालयात अनुपस्थित आहेत. त्यांच्याशी नोंदणीकृत पत्राद्वारे तसेच दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न झाले, मात्र त्यांचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सेवेत पुन्हा रुजू होण्यापूर्वी मुंबईतील जे. जे. रुग्णालयाच्या वैद्यकीय मंडळाचे फिटनेस प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले होते; परंतु त्यांनी अद्याप कोणताही वैद्यकीय अहवाल अथवा अनुपस्थितीचा खुलासा सादर केलेला नाही.
१५ दिवसांत हजर राहण्याचे आदेश :
या पार्श्वभूमीवर प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर नोटीस जारी केली आहे. नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत थोरात यांनी स्वतः कार्यालयात हजर राहून कामावर रुजू व्हावे किंवा आवश्यक वैद्यकीय कागदपत्रांसह लेखी खुलासा सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
एकतर्फी बडतर्फीची कारवाई होणार :
दिलेल्या मुदतीत त्यांनी खुलासा न केल्यास अथवा ते रुजू न झाल्यास, महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियमांनुसार त्यांच्याविरुद्ध थेट शिस्तभंगाची व सेवा समाप्तीची (बडतर्फी) एकतर्फी कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.