तरुणाला बेदम मारहाण करत लुटले... तडीपार गुंडासह चौघांवर अंबड पोलिसांत गुन्हा...

Share:
Main Image
Last updated: 21-Aug-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २१ ऑगस्ट - दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून टोळक्याने एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना सिडकोतील उषा हॉस्पिटल परिसरात घडली. तरुणाच्या खिशातील रोकड हिसकावून घेत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका तडीपार गुंडासह चौघांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न व लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मूळचा भुजबळ फार्म परिसरातील विश्राम अपार्टमेंटचा रहिवासी असलेला सुमित रजनिकांत क्षीरसागर (वय २३, सध्या रा. कान्हेरेवाडी, कालिदास कलामंदिराजवळ) हा तरुण रात्री भुजबळ फार्म भागात गेला होता. सिडकोतील उषा हॉस्पिटलजवळील हाजी चिकन सेंटरसमोर तो उभा असताना, संशयितांच्या टोळक्याने त्याला अडवले.

Advertisement

पैसे नाकारल्याने तुफान मारहाण :

टोळक्याने सुमितकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. सुमितने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्याने संशयित संतप्त झाले. त्यांनी सुमितला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर टोळक्याने सुमितच्या खिशातील १ हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली.

तडीपार गुंडाचा समावेश :

याप्रकरणी सुमित क्षीरसागरने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अनिल आठवले, गणेश शेजवळ आणि त्यांच्या इतर दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. संशयितांपैकी अनिल आठवले हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची कुठेही वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने अखेर पीडिताने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरी करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.